बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जाताना ताण तणाव कसा दूर ठेवावा आणि अभ्यासाचे कसे नियोजन करावे याबाबत दादर नवहिंद कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीतील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. शिक्षण, जनआरोग्य आणि महिला-बाल विकास या विषयांवर काम करणाऱ्या लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी केले जाते तयार
बारावीची परीक्षा अगदी तोंडावर आहे. तोच सुरुवातीचे दोन पेपर काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आले आहेत. आधीच विद्यार्थी हे ऑफलाईन की ऑनलाईन परीक्षा याबाबत गोंधळून गेले आहेत. या सर्व घडामोडींचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होत आहे. यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे तणावमुक्त परीक्षा देण्याविषयी लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्ट गेल्या महिन्यापासून शाळा आणि महाविद्यालयात समुपदेशन सत्र घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दादरमधील नवहिंद कनिष्ठ महाविद्यालयात काल समुपदेशनाचे सत्र ठेवण्यात आले होते. जवळपास ६० विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. शिक्षण क्षेत्रात मागील २० वर्ष काम करणारे संदीप परब यांनी यावेळी विद्यार्थ्यांना तणावमुक्तीचे आणि अभ्यासाचे सोपे तंत्र याबाबत मार्गदर्शन केले. संदीप परब यांनी मागील सात ते आठ वर्ष शिक्षण पद्धती आणि शिकवण्याचे नवनवीन तंत्र याबाबत सखोल अभ्यास केला आहे. शिक्षण मुलांवर लादू न देता त्यांच्यातील उपजत क्षमतेला प्रोत्साहन देणारी पद्धत सद्या आवश्यक आहे, असे मत संदीप परब यांनी यावेळी व्यक्त केले.
(हेही वाचा नवाब मलिकांचे मौन ठरणार मुलासाठी अडचणीचे…)
मुलांना मानले आभार
अतिशय योग्य वेळी आमच्या बारावीच्या विद्यार्थ्यांना समुपदेशन मिळाले आणि त्यांचा परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला अशी भावना नवहिंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या व्होकेशनल विभागाचे प्राचार्य शरद पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी प्राचार्या मनिषा गमरे, लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त प्रवीण काजारोळकर, शिक्षण सल्लागार शैलेश कसबे, डॉ. योगेश महामुणकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रमोद सावंत यांनी केले. समारोप व्होकेशनल विभागाचे प्राचार्य शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाने झाला. लोकमाध्यम चॅरिटेबल ट्रस्टने नुकताच शहापूर येथील दुर्गम भागातील दहावीच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले होते.
Join Our WhatsApp Community