‘मला वर जायच नाही, तुमच्या सोबतच रहायचय’, असे का म्हणाले छत्रपती संभाजी?

135

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, गरीब मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी भाजपाचे खासदार छत्रपती संभाजी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. छत्रपती संभाजी यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात हाच माझा शुद्ध हेतू असल्याचे म्हटले आहे. तसेच उपोषण करुन मला वर जायचे आहे, असं नाही, तर मला कायम तुमच्यासोबत रहायचे आहे, असे छत्रपती यांनी सांगितले. मी मराठ्यांचा सेवक तर आहेच, पण मी बहुजन समाजाचं नेतृत्व करतो, असेही छत्रपती संभाजी म्हणाले.

म्हणून मी प्रयत्नशील

माझी आमरण उपोषण करण्याची इच्छा नाही, पण माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती शाहू महाराजांंची एकच शिकवण आहे, जी माझ्या रक्तात आहे, जे माझे संस्कार आहेत. महाराजांनी नेहमी अन्यायाविरोधात लढा दिला आहे, शाहू महाराजांनीही बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी आपलं जीवन वेचलं. मी सुद्धा 2007 पासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असताना, या गरीब मराठ्यांची अवस्था मी पाहिली, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी, शाहू महाराजांनी एसी, एसटी, ओबीसी समाजाला न्याय दिला होता. तसाच न्याय या गरीब मराठ्यांना मिळावा म्हणून, मी सुद्धा प्रयत्न करत आहे, असं छत्रपती संभाजी यावेळी म्हणाले.

( हेही वाचा :यशवंत जाधवांसाठी ऑगस्टमध्येच लावलेली ‘फिल्डींग’! कोण होते यामागे? )

समाजापुढे होणारा त्रास काहीच नाही

आरक्षण हा दीर्घकालीन लढा आहे. कोणालाही सांगता येत नाही, वकिलांनाही सांगता येत नाही की पुढचे मार्ग काय असणार आहे? कधी निर्णय लागणार? त्यामुळे मी काही मोजक्या मागण्या निवडल्या आहेत. त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी आग्रही आहे. ज्या मागण्या मी निवडल्या आहेत त्या पूर्ण करणं सरकारला शक्य आहे. याआधी अशा गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या निमंत्रणावर मी जाणार आहे. मला आता त्रास होतो आहे, पण मराठा समाजासाठी हा त्रास काहीच नाही, असं म्हणत छत्रपती संभाजींनी आपली भूमिका ठामपणे मांडली.

मी मराठा समाजाचा सेवक

सगळ्या समन्वयकांना माझी विनंती आहे की, त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून, मागण्यांची पूर्तता करण्यासाठी मार्ग काढावा. तिथे व्यवस्थित मागणी करावी. समाजाचे प्रश्न मार्गी लावावे, आपला मोठेपणा न करता समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा. प्रामाणिकपणे माझं मत असं आहे की, या समाजाला न्याय मिळावा. आपण स्वत:च्या मनाने येथे आलो आहोत. मराठा समाजाला वेठीस धरु नका. मला काही वर जायच नाही, मला मराठा आणि बहुजन समाजासाठी खूप काही करायच आहे, असं म्हणत छत्रपती संभाजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांनी समाजासाठी केलेल्या कामाचे दाखले दिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.