पुण्यातील कात्रज घाटात अनेक जण फिरायला जात असतात. परंतु गेल्या काही वर्षात हाच कात्रज घाट गुन्हेगारांचा अड्डा बनत आहे. या परिसरात होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. या भागातील भौगोलिक परिस्थिती पाहता गुन्हेगारांना येथून सहज पळ काढता येतो तसेच या भागात अनेकदा रस्ते अपघातही होतात. त्यामुळे अशा घटनांचा तपास करणे सोयीचे व्हावे म्हणून प्रशासनाकडून महत्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे.
( हेही वाचा : दम्यावर मात करत तिने पार केला समुद्र! ९ वर्षीय चिमुकलीचा नवा विक्रम… )
पुणे पोलिसांनी केली सूचना
कात्रज घाट आणि नवीन बोगदा परिसर निसर्गरम्य ठिकाण आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या घाट आणि बोगद्यांचा परिसर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जागा झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. दाट झाडी आणि घाट असल्याने गुन्हेगार तेथून पसार होत आहेत. अशा घटनांचा तपास करणे आणखी सोपे व्हावे, यासाठी तेथे सीसीटीव्ही बसवावेत, अशी सूचना पुणे पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिली आहे.
मृतदेहाची विल्हेवाट कात्रज घाटात
खून एका ठिकाणी करायचा आणि मृतदेहाची विल्हेवाट कात्रज घाटात लावायची, अशी पद्धत गुन्हेगारांनी अवलंबली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी असे अनेक मृतदेह झाडाझुडपांतून शोधले आहेत. तर, दुसरीकडे ‘हिट अँड रन’ अपघातांत अनेकांचा मृत्यू या रस्त्यांवर झालेला आहे. या प्रकरणात पोलिसांना गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. याचे मुख्य कारण म्हणजे दोन्ही घाटांत सीसीटीव्ही नाहीत. म्हणूनच लवकरात लवकर सीसीटीव्ही लावावेत अशी सूचना, पुणे पोलिसांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community