भंडारा शहरात कोट्यवधी रुपये खर्च करून वाहतूक सिग्नल उभारण्यात आले आहेत. परंतु, सुमारे एक वर्षापासून हे सिग्नल सुरू करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सिग्नल तयार असूनही शहरात वाहतुकीचा खेळखंडोबा झाल्याचे चित्र आहे.
भंडारा शहरात 7 मार्च 2019 प्रशासकीय मंजूर मिळवत शहराच्या मुख्य 6 भागात ट्रॅफिक सिग्नल लावण्यात आले आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून 58 लाख 15 हजार मंजूर करण्यात आले त्यातून भंडारा शहरातील कलेक्टर चौक, मुस्लिम लायबरी चौक, शास्त्री चौक, कुकडे नर्सिंग होम चौक, नागपूर नाका आणि पोस्ट ऑफिस चौकात सिग्नल तयार करण्यात आले आहेत. हे सर्व काम नागपूरच्या आथेंटिक कॉर्पोरेशन द्वारे करण्यात आले आहे. परंतु, गेल्या एक वर्षापासून शहरातील सिग्नल सुरु झालेले नाहीत.
( हेही वाचा : प्रति लिटर 2 रुपयांनी ‘या’ कंपनीचे दूध महागणार )
वर्षभरापासून सिग्नल यंत्रणा बंद
यामुळे शहरातील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मागील दोन वर्षांचा विचार करता भंडारा शहरात तब्बल 68 लोकांचा रस्त्यावर अपघात झाला असून त्यात 29 लोकांचे अपघाती निधन झाले आहे, अपघाताची वाढती संख्या लक्षात घेता भंडारा शहरातील लोकांना वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी ट्रॅफिक सिग्नल योजना अमलात आणली होती, मात्र ही योजना आता रस्त्यावरील पांढरा हत्ती ठरत शोभेची वस्तू बनली आहे. यासंदर्भात नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता वाहतूक विभागाकडून सिग्नल हस्तांतरण प्रक्रिया करण्यास अडचण येत असून सुचविलेले विविध बदल करत नगर परिषद प्रशासन लवकरच वाहतूक विभागाला हे ट्रॅफिक सिग्नल महिन्याभरात हस्तातंरण करणार असल्याचे सांगण्यात आले.