रशियाने युक्रेनच्या विरोधात सुरु केलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही, त्यामुळे आता या विरोधात युरोपियन देश एकवटले आहेत, रशियावर चारही बाजूने टीका होऊ लागली आहे, तसेच आर्थिक निर्बंध लावले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता रशियावर क्रीडा क्षेत्रातही प्रतिबंध लावण्यात आला आहे.
‘फिफा’ने रशियाला केले हद्दपार
रशियाने मागील ५ दिवसांत युक्रेनमधील विविध शहरांवर कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. या युद्धात युक्रेनची मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. आता युक्रेनमध्ये सामान्य नागरिकांनाही हातात शस्त्रे घ्यावी लागली आहे. त्यामुळे विविध क्रीडा संघटनांनीही आता रशियाची कोंडी करू लागल्या आहेत. जागतिक फुटबॉल महासंघ ‘फिफा’ने रशियन संघाला यापुढे ‘रशिया फुटबॉल संघटना’ या नावाखाली खेळण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या संघाला रशियाचा ध्वज आणि राष्ट्रगीत वापरण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. या संघाचे सामने रशियाऐवजी त्रयस्थ ठिकाणी खेळवले जातील. तसेच ‘आम्ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, ‘युएफा’ आणि अन्य जागतिक क्रीडा संघटनांशी सातत्याने संवाद साधत आहोत. या चर्चेनुसार आम्ही पुढील निर्णय घेऊ,’ असेही ‘फिफा’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
(हेही वाचा Russia Ukraine War : युक्रेनवर अणुबॉम्ब टाकला, तर किती मृत्यू होतील? जाणून घ्या विध्वंस…)
जागतिक बॅटमिंटन संघटनेचा निषेध
पोलंडसह इंग्लंड, स्वीडन आणि अल्बेनिया यांसारख्या देशांनी रशियाविरुद्ध फुटबॉल सामने खेळण्यास नकार दिला आहे. या वर्षांअखेरीस कतार येथे ‘फिफा’ विश्वचषक होणार असून या स्पर्धेच्या पात्रता फेरीत रशिया आणि पोलंड यांच्यात प्ले-ऑफचा सामना रंगणार होता. या सामन्यातील विजेत्याला स्वीडन किंवा चेक प्रजासत्ताक यांच्याशी दोन हात करावे लागणार होते. मात्र, हे सर्वच संघ रशियाविरुद्ध खेळण्यास तयार नसल्याने ‘फिफा’च्या अडचणी वाढल्या आहेत. जागतिक बॅटमिंटन संघटनेने (बीडब्ल्यूएफ) आपल्या रशिया आणि बेलारूस येथे होणाऱ्या आगामी स्पर्धा रद्द करण्याचा सोमवारी निर्णय घेतला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे आंतरराष्ट्रीय ज्युडो महासंघाचे (आयजेएफ) मानद अध्यक्षपद तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community