छत्रपती शिवराय व समर्थ रामदासस्वामी यांचा संबंध जोडणारे तसेच शिवरायांबद्दल अवमानकारक उद्गार काढणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सल्लागार कोण आहेत, याचा शोध घेण्याची गरज असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
शिवरायांबद्दल त्यांना चुकीची माहिती पुरविणारे सल्लागार कोण?
राज्यपाल कोश्यारी हे एका राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत, ते अभ्यासू सुद्धा आहेत. शिवराय हे राष्ट्राचे आदर्श आहेत, असे खुलासेवजा विधान त्यांनी आता केले आहे. त्यामुळे मुळात वादग्रस्त विधाने करण्यापूर्वी त्यांनी काळजी घेतली असती तर अशी वेळच आली नसती, असेही बरगे म्हणाले. कोश्यारी हे महाराष्ट्रात नेहमी वादग्रस्त विधानांमुळे किंवा कृतीमुळे अडचणीत येत आहेत. शिवरायांबद्दल त्यांना चुकीची माहिती पुरविणारे सल्लागार कोण? हे पाहण्याची गरज आहे. किंबहुना राज्यपालांच्या सल्लागारांनी इतिहासाचा अभ्यास करून आपले ज्ञान वाढविण्याची गरज आहे.
(हेही वाचा ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत किती महाराष्ट्रीयन युक्रेनमधून परतले?)
इतिहासाच्या संशोधनानंतर आपले पूर्वीचे मत चुकीचे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या गुरू राजमाता जिजाऊ याच आहेत. त्यांनीच शिवरायांना सर्व प्रकारच्या शिक्षणाचे धडे दिले. राजमाता जिजाऊ व शहाजीराजे हेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आहेत, असेही बरगे यांनी दाखवून दिले आहे. इतिहासाचे संशोधन झाले नव्हते तोपर्यंत रामदास हे शिवरायांचे गुरु असल्याचे निर्देश करणारी अनेक पुस्तके, कथा, चित्रे, शिल्पे तयार झाली. आता इतिहासाच्या संशोधनानंतर आपले पूर्वीचे मत चुकीचे होते, हे मान्य करणे अनेकांना जड जाईल. पण शिवरायांवर खरी भक्ती असणाऱ्यांनी ते स्वीकारले पाहिजे व ते स्वीकारले आहे, असेही बरगे म्हणाले.
Join Our WhatsApp Community