रशिया-युक्रेनमधील युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. युक्रेनमधील खार्किव येथे मंगळवारी सकाळी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालय त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन शेखराप्पा असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो कर्नाटकातील रहिवासी आहे. खार्किवच्या प्रशासनाने यापूर्वीच अशी माहिती दिली होती की, रशियाने या भागातील निवासी भागामध्ये गोळीबार केला. आता या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या गोळीबारात जवळपास 11 लोकांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येतंय.
Ministry of External Affairs says that an Indian student lost his life in shelling in Kharkiv, Ukraine this morning. The Ministry is in touch with his family. pic.twitter.com/EZpyc7mtL7
— ANI (@ANI) March 1, 2022
विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे काम युद्धपातळीवर
दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याचे भारत सरकारचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना बुकारेस्टवरुन घेऊन येणारे सातवे विशेष विमान आज, मंगळवारी सकाळी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दाखल झाले आहेत.
(हेही वाचा – रशियाने ‘हा’ टाकला बाॅम्ब ज्यामुळे हवेतील ऑक्सिजन झाला गायब!)
या विमान कंपन्या ऑपरेशन गंगा मोहिमेत सहभागी
मुंबई विमानतळावर आज सकाळी 7 वाजता एअर इंडिया एक्सप्रेसचे विशेष विमान दाखल झाले. या विमानाने हेन्री कोनाद आंतरराष्ट्रीय विमानतळ, बुकारेस्टवरुन काल रात्री 11.10 वाजता मुंबईसाठी उड्डाण केले होते. ‘ऑपरेशन गंगा’ या विशेष मोहिमेअंतर्गत भारतीय नागरिकांना मायदेशी आणणारे हे सातवे विमान होते. एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि स्पाईसजेट या विमान कंपन्या ऑपरेशन गंगा मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमधून दिल्ली आणि मुंबईकडे आणण्यात येत आहे.