दिलासा! पुणे परिवहन महांडळाच्या कर्मचाऱ्यांची नोकरी झाली सुरक्षित…

पीएमपीएमएलच्या ११७ कर्मचाऱ्यांना महापालिकेत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा

117

पीएमटी व पीसीएमटी यांचे एकत्रीकरण करुन दोन्ही शहरातील प्रवाशांच्या सेवेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.ची स्थापना करण्यात आली. त्यावेळी दोन्ही विभागाच्या कर्मचाऱ्यांची या महामंडळात नेमणूक करण्यात आली. त्यातील ११७ कर्मचारी आजही पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करीत आहेत मात्र त्यांची अस्थापना पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) कडे आहे. या ११७ कर्मचाऱ्यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत समावून घेणेबाबत शासनाने मान्यता दिल्याने या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते.

(हेही वाचा – मुंबईचे शिल्पकार भागोजी शेठ कीर : महाशिवरात्रीचा जन्म आणि निर्वाणही! )

याबाबत माहिती देताना महापौर म्हणाल्या की, सन २००१ पासून पुणे महानगर पहिवहन महामंडळाचे जवळपास २३५ कर्मचारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागात काम करत होते. त्यातील सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त वगळून ११७ चतुर्थ श्रेणीतील शिपाई, हेल्पर, क्लिनर, वाहन चालक, लेबर यांच्यासह अन्य पदनामाचे कर्मचाऱी अद्यापही महापालिका सेवेत विविध विभागात काम करीत आहेत. हे सर्व कर्मचारी पिंपरी चिंचवड महापालिकेत काम करतात व त्यांना त्यांचे वेतन, भत्ते पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून अदा करण्यात येत आहे. तथापि या कर्मचाऱ्यांना द्यावी लागणारी वेतनापोटीची रक्कम ही महापालिकेला दरमहा पीएमपीएमएलकडे पाठवून द्यावी लागत आहे.

पुणे परिवहन महांडळाच्या कर्मचा-यांना मोठा दिलासा

गेल्या चार वर्षापासून वरील ११७ कर्मचा-यांकडून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर त्यांना सामावून घेण्यात यावे अशी वारंवार मागणी करण्यात येत होती. त्यानुषंगाने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या ११७ कर्मचा-यांना पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवर कायमस्वरुपी सामावून घेण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. तसेच या ठरावानुसार पीएमपीएमएलच्या संचालक मंडळामध्येही या कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेमध्ये सामावून घेण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. या दोन्ही ठरावानुसार महापालिका प्रशासनाने नोव्हेंबर २१ मध्ये व पीएमपीएमएल प्रशासनाने डिसेंबर २१ मध्ये याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेकामी पाठविलेला होता.

या प्रस्तावानुसार शासनाच्या नगरविकास विभागाने पीएमपीएमएलकडील ११७ कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कायमस्वरुपी सामावून घेण्यासाठी नुकतीच मान्यता दिलेली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करणेबाबत महापालिका प्रशासन व पीएमपीएमएल प्रशासन यांना सुचना दिल्या आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना यापुढे महापालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन, भत्ते व इतर सोयी सुविधा मिळण्यासाठीचा मार्ग सुकर झाला असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.