मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र अभयारण्यातून ४५ दिवसांत २५० किलोमीटरचे अंतर पार करत ४ वर्षीय वाघीण मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत अंबाबरवा अभयारण्यात दाखल झाली. त्यानंतर २६ दिवसांत १५० किलोमीटर भ्रमंती करत ही वाघीण सेमाडोह पर्यटन क्षेत्रात दाखल झाली आहे.
गळ्यात कॉलर आयडी असलेली मध्य प्रदेशातील ही वाघीण ३१ जानेवारीला अंबाबरवा अभयारण्यात कॅमेरात ट्रॅप झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच ती २६ फेब्रुवारीला सेमाडोह पर्यटन क्षेत्रात पर्यटकांसह मार्गदर्शकांच्या नजरेस पडली. गळ्यात कॉलर आयडी असल्यामुळे ती मध्य प्रदेशातून सेमाडोह वनपरिक्षेत्रात आल्याचा अंदाज होता. परंतु सोमवारी वन्यजीव अधिकाऱ्यांनी ही वाघीण मध्य प्रदेशातीलच आहे यावर शिक्कामोर्तब केले.
( हेही वाचा : ऑलिव्ह रिडलेला सेटलाईट टॅगिंग करताच ‘ही’ मोठी माहिती आली हाती…. )
लोकेशनसाठी हाय फ्रिक्वेन्सी रिसिव्हर अँटिना
वाघिणीचे लोकेशन मिळवण्यासाठी हाय फ्रिक्वेन्सी रिसिव्हर अँटिना आकोट वन्यजीव विभागातून सेमाडोह येथे दाखल झाला. वन्यजीव अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली तीन पथके तिचा शोध घेत आहेत. अंबाबरवा व्याघ्र अभयारण्यातून ही वाघीण १५० किलोमीटर जंगलभ्रमंती करत, ती सेमाडोह पर्यटन क्षेत्रात दाखल झाली आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पात इतके वाघ
अलिकडेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने ४७ वर्षे पूर्ण केली आहेत. मेळघाटात शंभराहून अधिक वाघ वास्तव्य करू शकतात. आज व्याघ्र प्रकल्पात ५० वाघ आहेत. यात २१ मादी आणि २९ नर आहेत.
(हेही वाचाः सीबीएसई, आयसीएसई नंतर आता महापालिकेची केंब्रिज मंडळाचीही शाळा)
Join Our WhatsApp Community