रशिया-युक्रेन युद्धात आता दिवसेंदिवस युक्रेनमध्ये जीवित हानी वाढत आहे. यामुळे युक्रेनमधून स्थलांतरितांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत एकट्या कीव शहरातून ८ लाख लोक स्थलांतरीत झाले आहेत. त्यानुसार भारतही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूपपणे मायदेशात आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरु केले आहे. मात्र त्यासाठी आता युक्रेनचे सैनिक अडथळा ठरत आहेत.
या सीमेवर होतोय विरोध
सध्या युक्रेनमधून बाहेर पाडण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना कसेही करून पोलंड, स्लोव्हाकिया, रोमानिया, हंगेरी या देशांच्या सीमाभागापर्यंत पोहचण्याची गरज आहे. त्याकरता विद्यार्थी बस, रेल्वेमधून सीमेपर्यंत येण्यासाठी धडपडत आहेत, मात्र आता युक्रेनचे जवानच विद्यार्थ्यांना बस, रेल्वेमध्ये चढण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी युक्रेनमध्येच अडकून पडत आहेत. विशेष म्हणजे हाच युक्रेन काही दिवसांपूर्वी रशियावर दबाव टाकून भारताने युक्रेनवरील हल्ला थांबवावा, अशी याचना करत होता. आज त्या युक्रेनकडून भारतीय विद्यार्थ्यांना मिळत असलेली ही वागणूक प्रक्षोभक ठरत आहे.
(हेही वाचा रशिया – युक्रेन युद्धात अमेरिका उतरणार नाही! जो बायडेन भाषणात काय म्हणाले?)
८ हजार विद्यार्थी सीमेपर्यंत पोहचण्यात यशस्वी
संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत भारताने रशियाविरोधी मतदान करण्याचे नाकारून आपला तटस्थपणा कायम ठेवला होता. त्यावर युक्रेनकडून ही प्रतिक्रिया आल्याचे दिसते. युक्रेनमध्ये २० हजाराहून अधिक भारतीय विद्यार्थी वैद्यकीय तसेच इतर प्रशिक्षण घेत होते. यापैकी जवळपास आठ हजाराहून अधिक विद्यार्थी सीमेपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत. युक्रेन सोडण्यासाठी पोलंडच्या सीमेवर पोहोचलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सूडबुद्धीचा फटका बसला. या विद्यार्थ्यांना रांगेत बराच काळ प्रतिक्षा करण्यास भाग पाडण्यात आले. या विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाचे कर्मचारी अन्नपाणी व निवारा पुरवित होते. पण युक्रेनचे जवान या विद्यार्थ्यांना सीमा ओलांडून ही मदत स्वीकारण्याची परवानगी देत नव्हते. इतकेच नाही तर यावर जाब विचारणार्या भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या जवानांनी लाथाबुक्यांनी तुडविले. काही जणांना तर सळ्यांनी मारहाण केली. भारतीय विद्यार्थ्यांनीच ही माहिती माध्यमांपर्यंत पोहोचविली. यानंतर भारतीयांमध्ये युक्रेनच्या विरोधात संतापाची भावना दाटली आहे.
Join Our WhatsApp Community