दाऊदच्या घरची धुणीभांडी आधी थांबवा…फडणवीसांचा हल्लाबोल

104

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यावर अख्खे राज्य सरकार त्यांना वाचवायला उभे राहिले आहे. पोलीस कोठडीत गेल्यावरही मलिक मंत्री पदावर कायम आहेत. त्यावरून हे सरकार राज्य घटनेचा अवमान करत आहे. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत, ते सरकार मुंबईच्या खुन्यांशी व्यवहार करणाऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, ही दुर्दैवी बाब आहे, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणारच, यासाठी भाजप सभागृहात संघर्ष करेल, त्यांच्यातले काही लोक दाऊदकडची धुणीभांडी करतायत. ती आधी बंद करायला लावा. दाऊदपुढे झुकणार आणि महाराष्ट्र झुकणार नाही ही जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतेय, ती आधी बंद झाली पाहिजे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधकांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी फडणवीस बोलत होते. या अधिवेशनात आम्हाला चर्चा करण्यात स्वारस्य आहे, राज्याच्या जनतेचे प्रश्न त्यात मांडले गेले पाहिजे. पण सरकारी पक्षाचीही अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे ही जबाबदारी आहे. अन्यथा ओबीसी आरक्षणावर बोलले म्हणून १२ आमदारांचे निलंबन केले गेले. विद्यापीठ सुधारणा विधेयक विरोधकांची मुस्कटदाबी करून या सरकारने मंजूर केले, अशा प्रकारचे व्यवहार हे सरकार करत असेल, तर आम्हालाही विचार करावा लागेल, असेही फडणवीस म्हणाले.

(हेही वाचा ‘बेस्ट’च्या मार्गावर एसटी, कारण…!)

हे सावकारी सरकार 

राज्याचा शेतकरी हवालदिल झाला आहे, वीज जोडणी कापायचे काम केले जात आहे. शेतकऱ्यांची वीज कापणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते, मात्र तरीही शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. अजित पवार यांच्या शब्दाला कुठलीही किंमत राहिलेली नाही. शेतकऱ्याला उभे पीक जळताना पाहावे लागत आहे. आधीच २ वर्षे आस्मानी संकटाला सामोरे जावे लागत आहे, आता सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. हे सावकारी सरकार आहे. ऊर्जा मंत्र्यांची वक्तव्ये ही हुकूमशाहसारखी आहेत. शेतकऱ्याला जाहीर केलेली मदत पोहचली नाही, असेही फडणवीस म्हणाले.

मविआ म्हणजे महाराष्ट्र नाही!

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण हे दोन्ही विषय महत्वाचे आहेत. या सरकारने छत्रपती घराण्यातील व्यक्तीला उपोषणाला बसायला लावले, ही दुर्दैवी बाब आहे. एकीकडे आदिवासी विकास विभागात आदिवासींचे पेसाचे पैसे देत नाही. परीक्षांचे घोटाळे संपत नाही, या सरकारचा भ्रष्टाचार परमसीमेवर पोहचला आहे. आजवरच्या सर्वात मोठे हे भ्रष्टाचाराचे सरकार आहे. स्वतः अन्याय करायचा आणि नंतर कांगावा करायचा महाराष्ट्र झुकणार नाही. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुमच्या सारख्या अहंकारी यांना महाराष्ट्र झुकवून दाखवले, १२ कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.