काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे. जनतेचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे काँग्रेसला राजकीय भवितव्य नसल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केले. ते नागपूर विमानतळावर बोलत होते.
लोक विश्वास ठेवणार नाहीत
यावेळी स्वामी यांनी सांगितले की, मी उत्तरप्रदेशात निवडणूक प्रचाराला गेलेलो नाही. परंतु, ज्यावेळी काँग्रेसच्या हाती सत्ता होती त्यावेळी त्यांनी लक्षणीय असे काहीच केले नाही. त्यामुळे काँग्रेसने आपली विश्वासार्हता गमावली आहे. आज घडीला प्रियंका वाड्रा काहीही बोलल्या, तरी लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. या घराण्याने काँग्रेस पक्षाला काहीही दिलेले नाही आणि ते देऊ सुद्धा शकत नाहीत. संपूर्ण देशात ते परदेशी मानले जातात आणि दिसतात सुद्धा, असा टोला स्वामी यांनी लगावला. दरम्यान पाचही राज्यांत भाजपला विजय मिळेल, असा विश्वास स्वामी यांनी व्यक्त केला.
( हेही वाचा: आरक्षणामुळे माझ्या मुलाला युक्रेनला जावे लागले! युक्रेनमध्ये ठार झालेल्या नवीनच्या वडिलाची व्यथा )
याचे विश्लेषण व्हावे
महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या संदर्भात स्वामी म्हणाले की, काँग्रेसच्या काळात देखील लोकांना अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख आणि नवाब मलिक निर्दोष असतील, तर त्यांच्यासमोर न्यायालयाचा पर्याय खुला आहे. महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेनेबाबत स्वामी म्हणाले की, हे दोन्ही पक्ष वेगळे होण्याच्या कारणाचे विश्लेषण केले पाहिजे.
बैठकीसंदर्भात मौन
सरसंघचालकांसोबतच्या बैठकीसंदर्भात बोलण्याचे स्वामी यांनी टाळले. संघ मुख्यालयात जाण्याबाबत स्वामींनी सांगितले की, डॉ. भागवत यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम नसल्यास त्यांना भेटायला आवडेल. दरम्यान भेटीचे कारण काय यासंदर्भात स्वामी काहीच बोलले नाहीत.
Join Our WhatsApp Community