IPL 2022 : मुंबईतून होणार रणसंग्रामाला सुरूवात

आयपीएल स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन

170

२६ मार्चपासून आयपीएल २०२२ चा प्रारंभ होत असून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे आयपीएलचे सामने होणार आहेत. त्यासाठी पोलीस, महानगरपालिका यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआय यांनी समन्वयाने काम करुन आयपीएल २०२२ स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याचे आवाहन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी संयुक्तपणे केले आहे.

यामुळे करण्यात आले आयपीएलचे आयोजन

कोविड प्रतिबंधात्मक नियम आणि सुरक्षा या दृष्टीने विचार करुन आयपीएल २०२२ स्पर्धा घ्याव्या लागणार आहेत. गेली दोन वर्षे कोविडच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलसारख्या स्पर्धा मुंबईत होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे क्रिकेटप्रेमींना हे सामने पाहता यावेत त्याचबरोबर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुण्यातील अर्थव्यवस्थेला या स्पर्धेमुळे गती मिळावी या उद्देशाने बीसीसीआयशी चर्चा करुन आयपीएल-२०२२ चे आयोजन करण्यात आले आहे, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथील पोलीस, महापालिका यांनी नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना देतानाच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा, त्यासाठी एसओपी तयार करण्याचे निर्देश मंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले.

आयपीएलनंतर ‘फिफा’चे होणार आयोजन

कोविड रुग्णांची संख्या कमी होत असल्याने २५ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती मर्यादा ठेवण्यात आली असून लसींचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यापूर्वी एशिया फेडरेशन फुटबॉल स्पर्धा यशस्वीपणे पार पडली असून आयपीएलनंतर ‘फिफा’चे देखील आयोजन करण्यात येणार असल्याचेही मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

(हेही वाचा – “तुम्हारा तो शोर है, हमारा तो दौर आएगा”! स्थायी समितीत कंत्राटाचे ९६ प्रस्ताव ठेवले राखून)

कोविडनंतर पहिल्यांदा आयपीएलचे सामने होणार असल्याने खेळाडू निवास करीत असलेल्या हॉटेल्सपासून स्टेडियमपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांवर ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याच्या सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या. खेळाडू राहत असलेले हॉटेल्स, सराव मैदाने, स्टेडियम या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले. या स्पर्धांचे ब्रॅण्डिंग करुन वातावरण निर्मिती करण्यासाठी संबंधित महानगरपालिकांनी उपक्रम राबविण्याच्या सूचना देतानाच सराव मैदानांची आणि परिसराची दुरुस्ती करण्यासाठी महानगरपालिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही नगरविकासमंत्री शिंदे यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृहात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत आयपीएल- २०२२ सामन्यांच्या वेळी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, पोलीस आयुक्त संजय पाण्डेय, नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे महापालिका आयुक्त विपीनकुमार शर्मा, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या टी-२० गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर, कार्यकारी सचिव सी.एस. नाईक, आयपीएलचे प्रमुख हेमांग अमिन यांचेसह वरिष्ठ पोलीस, महापालिका अधिकारी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.