भाजपचे नगरसेवक असे प्रकटले स्थायी समितीच्या सभेत!

106

मुंबई महापालिकेतील सदस्यांची मुदत संपुष्टात येत असल्याने शेवटच्या स्थायी समितीच्या सभेपुढे आलेल्या १८० प्रस्तावांवर अध्यक्ष आपल्याला बोलू न देता प्रस्ताव घाईगडबडीत मंजूर करतील या विचाराने भाजपने आंदोलनाची तयारी सुरु केली होती. त्यासाठी घोषवाक्ये लिहिलेले बॅनरच अंगावर परिधान करत भाजपचे सदस्य समितीच्या सभेमध्ये हजर झाले. परंतु अध्यक्षांनी कंत्राट कामांचे प्रस्ताव मंजूर न करता राखून ठेवल्याने अखेर भाजपच्या या आंदोलनाची हवा निघून गेली. सत्ताधारी पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसादच न मिळाल्याने भाजपच्या सदस्यांनी सभागृहाच्या व्हरांड्यात सत्ताधारी पक्षाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केल्याचे समाधान व्यक्त केले.

भाजपच्या सदस्यांची व्हरांड्यातून घोषणाबाजी

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेपुढे येणारे प्रस्ताव हे आयुक्तांनी मागे घ्यावेत अशाप्रकारची मागणी भाजपने यापूर्वी केली होती. परंतु बुधवारी झालेल्या सभेमध्ये समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे प्रस्ताव मंजूर करतील या विचाराने आजवरच्या अनुभवाच्या आधारे भाजपचे सदस्य आंदोलनाच्या तयारीने आले होते. प्रत्यक्ष सभेला सुरुवात झाल्यानंतर सभेमध्ये भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित राहिले. यामध्ये भालचंद्र शिरसाट, कमलेश यादव, विद्यार्थी सिंह, ऍड मकरंद नार्वेकर हे, ‘शिवसेनेने केले मुंबईकरांचे हाल, खाऊन खाऊन झाले लाल’,  ‘एक, दोन,तीन,चार, मुंबईकर झाले बेहाल, पाहून आघाडीचा भ्रष्टाचार’ अशाप्रकारची घोषवाक्ये असलेल्या बॅनरच शरीराला गुंडाळून सभेत उपस्थित राहिले. परंतु कंत्राटाचे प्रस्तावच राखून ठेवण्यात आल्याने भापजच्या सदस्यांना हल्लाबोल करता आला नाही. त्यामुळे शांततेत बाहेर पडणाऱ्या भाजपच्या सदस्यांनी व्हरांड्यात येवून जोरदार घोषणाबाजी केली.

(हेही वाचा – “तुम्हारा तो शोर है, हमारा तो दौर आएगा”! स्थायी समितीत कंत्राटाचे ९६ प्रस्ताव ठेवले राखून )

बहुमताने स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महापालिकेत अव्याहतपणे जो भ्रष्टाचार होतोय,त्याचा  निषेध म्हणून गणवेश असल्याचे सांगितले. स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना पक्ष हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समाजवादी पक्ष पाठिंब्यावर बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर करतात. याला भाजप विरोध करत आहे. तसेच आता तपास यंत्रणेच्याही पुढे काही गोष्टी आल्या आहे. त्यामुळे महापालिकेच्या करदात्याचा पैसा भ्रष्टाचारात जावू नये, त्याचा लाभार्थी कोण आहेत हे समोर यावे यासाठी भाजप प्रयत्न करत असून हा गणवेश म्हणजे त्यांचेच द्योतक असल्याचे  शिंदे यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.