ठाणे महानगरपालिका आणि वनविभाग बसवतेय ‘या’ माणसाळलेल्या प्राण्यावर मायक्रोचिपिंग!

116
शहरी जीवनात धुमाकूळ घालणा-या माकड या वन्यप्राण्याचा वावर आता संघर्षाचे कारण ठरु लागला आहे. सहज मिळणा-या मानवी खाद्याकडे आकर्षित होणा-या मानवाच्या या पूर्वजाने आता जंगलाची वाट सोडून काही शहरी भागांतच कायमचा निवास करण्याचा निर्णय घेतला की काय, अशी शक्यता आता वन्यजीव अभ्यासकांमध्ये व्यक्त केली जात आहे. यावर अभ्यास म्हणून ठाणे वनविभाग (प्रादेशिक) ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने ठाण्यातील माकडांवर मायक्रोचिपिंग बसवून त्यांचे स्वभाव, अधिवास याबाबत अभ्यास घेण्याच्या विचारात आहे.

म्हणून हा प्रयोग सुरु

गेल्या काही महिन्यांत वनविभागाने प्राण्यांचा बचाव करण्यात वनविभागाला साहाय्य करणा-या प्राणीप्रेमी संस्थांसह दरमहिन्याला बैठक घेऊन, सद्यस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई व ठाण्यात काम करणा-या प्राणीप्रेमी संस्था एकत्र येत होणा-या या बैठकीत शहरभरांत माकडांचा वावर धुमाकूळ घालत असल्याचे बोलले जात आहे. मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतचा परिसर, बोरिवली पश्चिमेकडील गोराई परिसर, कांदिवलीतील चारकोप परिसर, ते मध्य मुंबईतील कुर्ला, चेंबूर आणि मानखुर्द परिसरात माकडांचा कळपासह वावर दिसू लागला आहे. ठाण्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतचा भाग येऊर, ठाणे उपवन आदी भागांत माकडांचा वावर सातत्याने दिसत आहे. त्यामुळे माकडांच्या बदलत्या हालचाली जाणून घेण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग ठाण्यात सुरु करण्याचा वनविभागाचा विचार सुरु आहे.
तर माकडांचीही  होणार नसबंदी
माकडांची वाढती झुंड लक्षात घेता हा मायक्रोचिपिंगचा प्रयोग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या अभ्यासानंतर हिमाचल प्रदेश तसेच दिल्लीत माकडांची संख्या नियंत्रणात राहण्यासाठी माकडांची नसबंदी केली होती. तशीच नसबंदी ठाण्यात, मुंबईतही करावी लागेल का, याबाबतचा अंतिम निर्णय वनविभागाकडून घेतला जाणार आहे.

मानव-माकड संघर्ष बदलतोय

दोन महिन्यांपूर्वी माकडाच्या हल्ल्यात ठाण्यात एकाला १८ टाके पडले होते. ही घटना लक्षात घेत मानवी वस्तीत सहज मिळणा-या अन्नपदार्थांवर ताव मारणारा माणसाचा हा पूर्वज आता हिंसक मार्गाने जवळ येत असल्याचे निदर्शनास येत आहे. चेंबूर परिसरात मध्यंतरीच्या काळात माकड मोठ्या संख्येने मानवी वसाहतीत येऊन घरातील फ्रिज खोलून अन्नपदार्थ खाऊन परतायचे. याबाबत वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाकडून मदत येईपर्यंत माकड पसार झालेले असायचे.
बोरिवली गोराई, चारकोप परिसरात माकड उंच इमारतीत येत घरातील टीव्ही फोडल्याच्याही तक्रारी आहेत.

माकडांवर मायक्रोचीप बसवताना …

माकडासारख्या झुंडीत राहणा-या वन्यप्राण्याला होणारे शहरी जीवनाचे आकर्षण जाणून घेण्यासाठी माकड शहरात वावरल्यानंतर पुन्हा जंगलात परतात का, त्यांचा शहराकडेच कायमचे घर करण्याचा इरादा दिसतोय का, हे जाणून घेण्यासाठी माकडांवर मायक्रोचिपिंग करण्यात आले आहे.
वन्यजीव अभ्यासकांचे मत
मात्र, हा प्रयोग केवळ एकाच माकडावर होऊन मर्यादित माहिती मिळेल, अशी शक्यता वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली. मायक्रोचिपिंग लहान तसेच प्रौढ माकड, नर-मादी, झुंडीतील प्रमुख माकड आदी सर्वांवर व्हायला हवी. वाढत्या माकडांच्या शहरी जीवनाच्या वावरात केवळ सहज उपलब्ध अन्नपदार्थ हे एकच कारण नाही. शहरांत सहज वावरणारी माकडे ही मुळात मदा-यांनी सोडलेली माकडे असावीत, असाही कयास बांधला जात आहे. मानेवर सतत पट्ट्यातून तिथे केस कमी असणे, तेलकट पदार्थ खाल्लाने शरीरावर दिसणारे चट्टे, शरीरावरील इतर चट्ट्यांच्या निरीक्षणातूनही बरीचशी माहिती समोर येऊ शकते, अशी माहिती वन्यजीव अभ्यासकांनी दिली आहे. शहरात वड, पिंपळ इतर फळबागा असतील तर माकडांचा वावर वाढण्यासाठीही पुरेसे कारण ठरते. मात्र केवळ एका माकडावर मायक्रोचिपिंग होऊन चालणार नाही. किमान पन्नास माकडांवर मायक्रोचिपिंग बसवावी लागेल, असेही वन्यजीव अभ्यासकांनी सांगितले.

( हेही वाचा: ईडी हाताळत असलेली हाय प्रोफाईल प्रकरणे! ‘हे’ आहेत घोटाळ्यांचे ‘नवाब’? )

तर मार्गदर्शक तत्त्वांतही होणार बदल 
शहरांत माकड या वन्यजीव प्राण्याचा वावर असला, तरीही स्थानिक स्वराज्य संस्थाही माकडाचा बचाव करण्यास बांधील असल्याचे सरकारनेच आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये (एसओपी)नमूद आहे. मात्र बरीच वर्ष मुंबईत वाढत्या माकडांच्या वावरात हा प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने वनविभागालाच लक्ष केंद्रीत करायला सांगितल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता मार्गदर्शक तत्त्वांमध्येच बराच बदल घडवून सर्वच सरकारी आस्थापनांमधून सहकार्याच्या माध्यमातून हा संघर्ष कमी करण्यासाठी तजवीज करावी लागेल, अशी माहिती वनविभागाच्या अधिका-यांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.