#WorldWildlifeDay देशातील वन्यजीव आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी टॉप ५ पर्यटनस्थळे!

126

जगभरात ३ मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा केला जातो. १९७० च्या दशकात वन्यप्राण्यांच्या शिकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. याच पार्श्वभूमीवर वन्यजीवांविषयी जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने वन्यजीव दिवस ठरवला. २०१३ च्या अधिवेशनात ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित करण्यात आला. आज आपण या वन्यजीव दिनानिमित्त देशातील वन्यजीव आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी असलेली टॉप ५ पर्यटनस्थळांची माहिती घेणार आहोत.

१. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान

रणथंबोर राष्ट्रीय उद्यान देशातील लोकप्रिय वन्यजीवांपैकी एक मानले जाते. राजस्थान मध्ये असलेल्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. जंगल सफारींचा आनंद आणि सूर्यास्ताचे दर्शन घेण्यासाठी हे राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. या राष्ट्रीय उद्यानात फिरण्यासाठी जीप आणि कॅंटरची सुविधा आहे. त्यांचे भाडे वेगवेगळे आहे. जीप सफारीसाठी जीपमध्ये एकूण ६ जण बसू शकतात, तर दुसरीकडे कॅन्टरमध्ये १६ जणांची बसण्याची व्यवस्था आहे. जर तुम्ही जीपच्या सर्व सीट बुक केल्या तर तुम्हाला ६ हजार ५०० रूपये भाडे आकारले जाईल आणि जर तुम्ही जीपची एकच सीट बुक केली तर त्यासाठी तुम्हाला १ हजार १०० रुपये द्यावे लागतील. कँटरमधील सीटचे भाडे ६५० रूपये आहे.

( हेही वाचा : मध्य प्रदेशातून आली ४ वर्षीय वाघीण! असा लावला शोध )

२. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क

जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे नैनितालच्या कुशीत वसलेले आहे. हे नॅशनल पार्क टायगर रिझर्व्हचा भाग आहे. याठिकाणी तुम्हाला पांढरा वाघ सुद्धा पाहता येईल. वाघांव्यतिरिक्त तुम्ही या पार्कमध्ये, ठिपकेदार हरीण, हत्ती, सोनेरी कोल्हा, सांबर पाहू शकता तसेच कोसी नदी आणि कॉर्बेट फॉल्सचा आनंद घेऊ शकता.

३. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश जागतिक वारसा स्थानांत केलेला असून, भारतीय एकशिंगी गेंड्यांपैकी दोन-तृतीयांश गेंडे काझीरंगा अभयारण्यात आढळतात. काझीरंगामध्ये अनेक वाघ असून २००६ मध्ये याला वाघांचे अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. या जंगलात अनेक हत्ती, पाणम्हशी तसेच हरणे आढळतात. काझीरंगा हे भारतातील वन्यजीवांसाठी सर्वात जास्त सुरक्षित अभयारण्य मानले जाते.

४. कोयना वन्यजीव अभयारण्य

कोयना वन्यजीव अभयारण्य हे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले सर्वात सुंदर वन्यजीव अभयारण्यांपैकी एक आहे. किंग कोब्रा, रॉयल बंगाल टायगर्स आणि विविध पक्ष्यांचे हे प्रमुख केंद्र आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात हे अभयारण्य वसलेले असून भारत सरकारने १९८५ मध्ये या संरक्षित वनक्षेत्राला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले.

५. काराकोरम वन्यजीव अभयारण्य

काराकोरम वन्यजीव अभयारण्य लेह जिल्ह्यातील काराकोरम पर्वतश्रेणीच्या पूर्वेकडील भागात आहे. या अभयारण्यात तुम्हाला तिबेटी काळवीट, जंगली याक, हिम तेंदुए, लाल कोल्हे, लांडगे आणि ओटर्स पाहायला मिळतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.