भारतीय मायदेशी येईपर्यंत ‘ऑपरेशन गंगा’ सुरू राहणार! विमानतळावर विशेष सुविधा

सर्व भारतीयांना मायदेशी परत आणेपर्यंत ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम सुरूच राहील.

101

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत 183 भारतीयांना घेऊन एअर इंडिया एक्स्प्रेस-IX 1202 हे विमान आज पहाटे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. हे विमान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय प्रवाशांना घेऊन, बुखारेस्ट येथून मध्यरात्री निघाले होते. केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी विमानतळावर या प्रवाशांचे स्वागत केले. यावेळी या सर्व प्रवाशांचे नातेवाईक देखील विमानतळावर उपस्थित होते.

भारतीयांचे स्वागत केल्यावर दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ऑपरेशन गंगा अंतर्गत, युक्रेनमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे दानवे म्हणाले. सुमारे 17 हजार भारतीय, ज्यात बहुसंख्य विद्यार्थी आहेत, हे भारतीय नागरिक तिथे अडकले असून त्यापैकी सुमारे 4 ते 5 हजार नागरिकांना भारतात परत आणले गेले आहे. तिथे असलेल्या सर्व भारतीयांना मायदेशी परत आणेपर्यंत ‘ऑपरेशन गंगा’ ही मोहीम सुरूच राहील, अशी माहितीही त्यांनी दिली.

( हेही वाचा : मध्य रेल्वेचा ‘हा’ नवा उपक्रम, आता अशी करा करमणूक )

मदत आणि आरक्षण कक्ष स्थापन

परदेशातून मायदेशी येणाऱ्या प्रवाशांना आपापल्या गावी परत जाण्याची सोय करण्यासाठी, भारतीय रेल्वेने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वरच एक मदत आणि आरक्षण कक्ष स्थापन केला आहे, अशी माहिती दानवे यांनी दिली. या कक्षांद्वारे नागरिकांना त्यांच्या मूळगावी जाता यावे, या दृष्टीने मदत केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. दानवे यांनी परत आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि या विद्यार्थ्यांची त्यांच्या गावी जाण्याची नीट सोय केली जावी, अशा सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. या विमानातून परत आलेल्या एका विद्यार्थिनीने युद्धग्रस्त भूमीतून सुटकेचे चित्तथरारक अनुभव सांगितले. या कठीण परिस्थितीत, भारतीय दूतावास आणि तिथल्या नागरी सहकारी संस्थांनी केलेल्या मदतीबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी केली पुतीन यांच्याशी चर्चा

ऑपरेशन गंगा अंतर्गत उड्डाणे नुकतीच वाढवण्यात आली आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे नियंत्रण कक्ष तसेच युक्रेन, पोलंड, रोमानिया, हंगेरी आणि स्लोव्हाक इथे असलेल्या भारतीय दूतावासांचे नियंत्रण कक्ष 24 तास सुरू असून, सर्व गरजू नागरिकांना आवश्यक ती मदत दिली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्याशी बुधवारी दूरध्वनीवरुन संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील स्थितीचे, विशेषतः खारकीवमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेविषयी चर्चा केली. भारतीय नागरिकांना युद्धजन्य प्रदेशातून सुरक्षित बाहेर काढण्याविषयी उभयतांमध्ये चर्चा झाली.

(हेही वाचाः भारतीयांचे मदत आणि पुनर्वसन करणारी योजना सुरु राहणार!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.