दहशतवाद विरोधी पथक कोणाच्या दहशतीखाली? वाचा पोलीस दलातील धक्कादायक परिस्थिती…

165

मुंबई पोलिसमधील अधिकारी वर्गात एकमेकांमध्ये हेवेदावे, चढाओढ, स्पर्धा असणे ही बाब काही नवीन नाही. पण पोलिसांतील एखाद्या विभागाचा प्रमुख हा त्याच्या विभागांतर्गत हुकूमशाही गाजवत असेल, तर ही बाब अधिक चिंताजनक आहे. मुंबई पोलिसातील राज्य दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत पोलीस कर्मचारी दररोज याचा अनुभव घेत आहेत. याची सविस्तर माहिती एटीएसच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने थेट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहून दिली आहे. तसेच याची गृहमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे, असेही या पत्रात म्हटले आहे. आधीच पोलीस दल हे परमबीर सिंग, सचिन वाझे यांच्यामुळे बदनाम झाले आहे, असे असताना पोलीस दलातील दहशतीचा विषय समोर आला आहे, याची राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री दखल घेणार का, संबंधित अधिका-यावर कारवाई करणार का?, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

एटीएसमधीलच एका अधिकाऱ्याने नावासकट असे पत्र लिहिणे हे अत्यंत धक्कादायक आहे. याची चौकशी करणे आवश्यक आहे. बॉम्ब ब्लास्ट विरोधी पथकामध्येच ही अवस्था आहे. हे अत्यंत संतापजनक आहे. एटीएसमधल्या अनेक जागा या अजून भरल्या गेल्या नाहीत, अर्थात बॉम्ब ब्लास्ट घडवणाऱ्या दाऊदशी आर्थिक संबंध ठेवणाऱ्या मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या महाभकास आघाडी सरकारकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार? हा विषय आपण विधानसभेत उपस्थित करून सरकारला जाब विचारणार आहे.
अतुल भातखळकर, भाजप नेते, आमदार.

पोलिसांचे मनोबल होते खच्ची… 

तुम्ही वेडे आहात, नालायक आहात, तुम्हाला काहीही येत नाही, तुम्हाला कंट्रोल रूमला पाठवून देतो, तुम्ही पुन्हा माझ्या समोर येऊ नका, तुम्हाला निलंबित करेन, अशा शब्दांत एटीएसमधील हा प्रमुख विभागातील कर्मचाऱ्यांचा अपमान करत आहे, त्यांना धमकावत आहे. त्यांचा सन्मान राखत नाही. असे वर्तन गुन्हेगारांशीही केले जात नाही किंबहुना हे असे वर्तन राज्य घटनेलाही अभिप्रेत नाही. या सर्वाचा परिणाम म्हणून कर्मचाऱ्यांचे मनोबल खचत आहे, असा गंभीर इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे. त्यामुळे याची तातडीने चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

या संदर्भात एटीएसमधील उपायुक्त राजकुमार शिंदे यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

(हेही वाचा मुंबईचे नवीन पोलिस आयुक्त बनले जनसेवक! उचलले ‘हे’ पाऊल…)

…तर अधिकारी, कर्मचारी आत्महत्या करतील! 

या सर्व परिस्थितीची झळ काही आयपीएस अधिकाऱ्यांनाही बसली आहे. या अधिकाऱ्याच्या अशा वागण्यामुळे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परस्पर बदली करून घेतली. एटीएसमधील या अधिकाऱ्याच्या सततच्या चुकीच्या वागण्यामुळे अधिकारी, कर्मचारी आत्महत्या करतील, असा गंभीर इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे. अशा प्रकारे दहशतवाद विरोधी पथकामधील अधिकारी आणि कर्मचारी हे विभागातील प्रमुखाच्या दहशतीखाली आहेत का, याची चौकशी व्हावी आणि त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.