मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांत साधी व हृदयरोग अर्थात कार्डियाक रुग्णवाहिकांची सेवा पुन्हा एकदा भाडेतत्वावर घेतल्या जात आहेत. कोविडपूर्वी एक वर्ष आधी दोन वर्षांकरता ९ रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिका भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल होता. परंतु आता याच कंत्राटदाराला पुन्हा एकदा दोन वर्षांकरता भाडेतत्वावर रुग्णवाहिकांची सेवा दिली जाणार असून जानेवारी २०१९च्या तुलनेत कंत्राटदाराने सुमारे अडीच कोटींचा अधिक दर आकारुन हे काम मिळवले असून स्थायी समितीच्या सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याने आता अखंडित सेवा सुरु राहणार आहे.
( हेही वाचा : प्रभादेवी, वरळीत १,२७५ सदनिका, पण कोणत्या प्रकल्पबाधितांसाठी? )
खासगी संस्थेची नेमणूक
मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयात साधी व हृदयरोग रुग्णवाहिन्यांची सेवा भाडेतत्वावर पुरवण्यासाठी जानेवारी २०१९मध्ये खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. यामध्ये साध्या रुग्णवाहिका २० आणि कार्डियाक रुग्णवाहिका ५ अशाप्रकारे तीन पाळ्यांमध्ये सेवा देण्यासाठी कंत्राट दिले होते. त्यामध्ये केईएम २, नायर २, शीव ४, कुपर १, ट्रामा १, महापालिका सर्वसाधारण रुग्णालय बोरीवली १, शिवडी जीटीबी २, कस्तुरबा २ आणि शताब्दी १ याप्रकारे २० साध्या रुग्णवाहिका आणि केईएम ०१, कुपर ०१, जीटीबी ०१, कुपर ०१ आणि ट्रॉमा ०१ याप्रमाणे ५ कार्डियाक रुग्णवाहिका घेण्यास हे कंत्राट देण्यात आले होते. या दोन वर्षांकरता निर्मल एंटरप्रायझेस या कंपनीला ९.९५ कोटींचे कंत्राट देण्यात आले होते. पुढे कोविडमुळे त्यानंतर सहा महिन्यांकरता दोन वेळा मुदतवाढ देत अनुक्रमे २.५३ कोटी, २.५३ कोटींचे काम देण्यात आले होते.
स्थायी समिती बैठकीत प्रस्ताव मंजूर
परंतु हा कालावधी मार्च २०२२मध्ये संपुष्टात येत असल्याने मागवलेल्या निविदेमध्ये पुन्हा निर्मल एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली असून त्यांनी दोन वर्षांकरता १२.७० कोटी रुपयांची बोली लावली आहे. यामध्ये साध्या रुग्णवाहिकेसाठी पहिल्या वर्षांकरता २२५० रुपये प्रती पाळी आणि दुसऱ्या वर्षांकरता २३४९ प्रती पाळी अशाप्रकारे दराची बोली लावली आहे. तर कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी पहिल्या वर्षीसाठी ३१०५ रुपये आणि दुसऱ्या वर्षांकरता ३२४० रुपये अशाप्रकारे प्रती पाळी बोली लावली आहे.
मात्र, या संस्थेकडून पुन्हा भाडेतत्वावर रुग्णवाहिका भाडेतत्वावर देण्यात येत असल्या तरी कोरोना काळात या रुग्णवाहिका कुठे गेल्या होत्या. या काळात महापालिकेच्यावतीने दोनशेहून अधिक रुग्णवाहिका सज्ज केल्या होत्या. एका बाजूला सीएसआर निधीतून या रुग्णवाहिकांची सेवा देण्यात आलेली असताना दुसरीकडे या रुग्णवाहिकांच्या सेवांकरता कोट्यवधी रुपये मोजण्यात आले आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत यावर कोणत्याही प्रकारची चर्चा न करता हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Join Our WhatsApp Community