पटेल न पटेल : पवई ते घाटकोपर जलाशयाच्या रखडलेल्या कामाचे कंत्राट पुन्हा त्याच कंपनीला!

184

पवई ते वेरावली व पवई ते घाटकोपर या जलबोगदा पाणी प्रकल्पातील मागील सहा वर्षांपासून रखडलेल्या पवई ते घाटकोपर जलाशय यादरम्यान भूमिगत जल बोगद्याचे काम पुन्हा त्याच कंपनीला देण्यात येत आहे. या रखडलेल्या कामांसाठी ३८ कोटींवर मांडवली करणाऱ्या कंत्राटदाराने याच कामासाठी मागवलेल्या निविदेत पुन्हा भाग घेऊन तब्बल ४०२ कोटींमध्ये आणि विविध करासंह ६०७ कोटींमध्ये काम मिळवले आहे. हे काम याच कंत्राटदार व महापालिकेच्या वादात अडकले होते,  त्यामुळे हे कंत्राट रद्द करण्यात आले होते. या उर्वरीत कामांसाठी १४७ कोटींचा खर्च अपेक्षित होता, परंतु प्रत्यक्षात हा खर्चही तिपटीच्या घरात गेला आहे. त्यामुळे पटेल न पटेल, पुन्हा त्याच कंपनीने नव्याने निविदेत भाग घेत कंत्राटाची रक्कम वाढवून घेत, काम पदरी पाडून घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

पण तरीही काम अपूर्णच

मुंबई महापालिकेने अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, सांताक्रूझ-वांद्रे पश्चिम, कुर्ला आणि घाटकोपर या भागातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पवई ते वेरावली वेगामध्ये आणि पवई ते घाटकोपर तसेच पुढे घाटकोपर जलाशयाच्या जोडणाऱ्या भूमिगत जलबोगद्याचे काम हाती घेतले. सत्ताधारी शिवसेनेने आपल्या वाचन नाम्यात या जलबोगद्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे हे काम ८ डिसेंबर २०११ रोजी स्थायी समितीच्या मंजुरीने देण्यात आले. पटेल इंजिनिअरिंग या कंपनीला २२३.१५ कोटी रुपये देण्यात आले होते. पावसाळा धरून ५२ महिन्यांमध्ये हे करण्यात येणार होते. या कामाला १९ जानेवारी २०१२ मध्ये सुरू करण्यात आले. त्यामुळे हे काम १८ मे २०१६पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु यातील तांत्रिक अडचणींमुळे या कामाचा कालावधी ३० सप्टेंबर२०२१ पर्यंत वाढवण्यात आला होता. पण  या कालावधीत हे काम पूर्ण करता आलेले नाही. हे काम सुरू असतानाच, जून २०१६ मध्ये बोगदा खोदकामामध्ये अडचणी आल्या होत्या. त्यामुळे या कामाची गती मंदावली होती. त्यातच ऑगस्ट २०१९ मध्ये पवई येथील शिपिंग कॉपोरेशन ऑफ इंडियाच्या परिसरात जमीन खचून मोठा खड्डा निर्माण झाला होता. हा खड्डा खोदकाम झालेल्या लगतच्या जागेवर होता. हे काम ऑगस्ट २०१९ पासून बंद होते.

( हेही वाचा भारतीयांचे मदत आणि पुनर्वसन करणारी योजना सुरु राहणार! )

खर्च कोटींच्या घरात

या कामासाठी २२३ कोटींचे कंत्राट असल्याने कंत्राटदाराने प्रथम १६७.७७ कोटी रुपयांचा दावा केला होता. रकमेपैंकी फेब्रुवारी २०१३ ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीतील ३४.३८ कोटी रुपयांच्या दाव्याबाबत लवाद प्रक्रिया सुरु केली. मात्र पुढील कामासाठी १२०.२८ कोटी रुपयांच्या दाव्याची तडजोड करण्यास कंत्राटदार तयार झाला. त्यामुळे पटेल इंजिनिअरींग कंपनीला १६७.७७ कोटी रुपयांच्या दाव्यापैंकी ३८ कोटी रुपयांची रक्कम देण्यास आणि सर्व दावे मागे घेण्यास कंपनी तयार झाल्याने, ही रक्कम देऊन त्यांचे कंत्राट रद्द करून नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला होता.  हे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी १४७.६८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात या कामाचा अंदाज दुपटीपेक्षा जास्त म्हणजे  ३९८ कोटींचा केला गेला. या निविदा प्रक्रियेमध्ये पुन्हा पटेल इंजिनिअरींग ही कंपनी पात्र ठरली असून, त्यांनी उणे शुन्य पूर्णांक ६८ टक्के कमी बोली लावत हे काम ३९७.७५  कोटींमध्ये मिळवले. विविध करांसह या उर्वरीत कामांचा खर्च ६०७ कोटींवर पोहोचला आहे. या कामांमध्ये बोगदा खोदाई यंत्राचा सहाय्याने बोगदा खणणे, न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडने अर्थात एनएटीएम पध्दतीने बोगदा खणणे, बोगद्यामधील सिमेंट काँक्रिटचा गिलावा करणे, बोगद्यामध्ये पोलादी गिलावा करणे, जलवाहिन्यांची  निर्मिती करणे, तसेच बोगद्यामधील खणलेल्या मातीचे वहन करणे आदींचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.