पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात असलेल्या श्री नागेश्वर महाराजांच्या उत्सवातील मानाचा विडा तब्बल 91 लाखाला, खणा नारळाची ओटी 41 लाख तर लिंबू आणि चांदीच्या छोट्या पादुका तब्बल 22 लाखात विकल्या गेल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल हा तर अंधश्रद्धेचा प्रकार आहे. मात्र मोशी ग्रामस्थांना हा प्रकार श्रद्धेचा वाटतो आणि परंपराही वाटते. शेकडो वर्षांची परंपरा जपण्यासाठी मग मोशी गावची मंडळी अगदी रीतसर लिलाव करुन उत्सवातील प्रत्येक वस्तू विकतात. मग विकल्या जाणाऱ्या वस्तूमध्ये अगदी बुंदी, चपाती, नारळ, फुल, पान यांचीही बोली लागते. पण इथे जास्त किंमत मिळते ती मानाच्या विड्याला, ओटीला आणि लिंबू पादुकाला!
हा उत्सव मागील 200 वर्षांपासून भरतो
ग्रामस्थ आणि संस्थाचे विश्वस्त असलेल्या नितीन सस्ते यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा उत्सव मागील 200 वर्षांपासून भरतो आणि उरुसाचा प्रसाद म्हणून विकल्या गलेल्या वस्तूंची रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरली जाते.दरम्यान, गणेश कुदळे या व्यवसायिकाने यावर्षी तब्बल 91 लाखाला मानाचा विडा विकत घेतला. त्यांच्या मते हा विडा विकत घेतल्यापासून त्यांच्या व्यवसायात तेजी आली आणि यश मिळालं. 41 लाख देऊन मानाची ओटी विकत घेणारे निलेश बोराटे यांनी देखील आपण श्रद्धेपोटी ओटी घेतल्याचं सांगितलं.
(हेही वाचा – 100व्या कसोटीत कोहलीची ‘विराट’ कामगिरी! ‘इतक्या’ धावांचा गाठला पल्ला)
अंधश्रद्धा म्हणायची की श्रद्धा?
बोराटे यांच्यामते ओटी विकत घेण्यासाठी दिलेले 41 लाख रुपये देवस्थानमार्फत सामाजिक कार्यासाठी खर्च केले जातात आणि त्यामुळे एकीकडे परंपरा जपत सामजिक कार्यात हातभार लागत असल्याचा समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थातच राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आहे. मात्र या उत्सवात कुठलाही आघोरी प्रकार घडत नाही आणि लिलाव होणाऱ्या वस्तू प्रसाद असं असल्याने त्यापासूनही कुणाला हानी होत नसल्याचा दावा केला जातो. हा सगळा प्रकार जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या समोर घडतो. त्यामुळे याला अंधश्रद्धा म्हणायची की श्रद्धा हे तर तुम्हीच ठरवा!
Join Our WhatsApp Community