मुंबईच्या पाणथळ भागात हिवाळ्यात भेट देणारा फ्लेमिंगो हा सागरी पक्षी सहसा मानवी वस्तीजवळ जाणे पसंत करत नाही, परंतु गेल्या महिन्यात नवी मुंबईतील सीवूड परिसरातील पाम बीच परिसरातील दुचाकीस्वाराला मध्यरात्री एक फ्लेमिंगो पक्षी रस्त्यावर चालताना दिसला. या पक्ष्याच्यापाठी भटके कुत्रे लागले होते. कुत्र्यांच्या हल्ल्यात फ्लेमिंगो पक्ष्याचा जीव जाऊ नये, म्हणून राघव दत्ता या दुचाकीस्वाराने लगेचच ठाण्यातील वाईल्डलाईफ वेलफेअर असोसिएशन (डब्ल्यूडब्ल्यूए) या प्राणीप्रेमी संस्थेच्या हेल्पलाईन क्रमांकावर फ्लेमिंगो पक्ष्याच्या बचावासाठी मदत मागितली.
सुखरुप सूटका केली
संस्थेच्या ओंकार सुवरे, अथर्व बईत, अभिजीत मोरे या तीन स्वयंसेवकांनी तासाभरात घटनास्थळी धाव घेतली. पोहोचताच क्षणी त्याचा पंधरा मिनिटांत बचाव केला. भल्या पहाटे तीन वाजता फ्लेमिंगोची मानवी वस्तीतील भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका झाली. ही घटना गेल्या महिन्यात घडली तिन्ही स्वयंसेवकांनी डॉ चरिअर्स क्लिनिक या पशुवैद्यकीय दवाखान्यात फ्लेमिंगो पक्ष्याला नेले. डॉ जया चेरीअर्स यांनी फ्लेमिंगो पक्ष्याला तपासले. त्याच्या शरीरावर कुठेही जखमा आढळून आल्या नाहीत. तो तहानलेला असल्याने डॉक्टरांनी त्याला पाणी पाजले. फ्लेमिंगो तणावातच असल्याचे दिसत असल्याने, त्याला काही काळ दवाखान्यात एकटे सोडण्यात आले. कदाचित तणावामुळेच फ्लेमिंगो पक्ष्याला भटक्या कुत्र्यांपासून आपला बचाव करण्यासाठी उडता आले नाही.
कदाचित ताणामुळे पक्षी एकटा चालत चालत नजीकच्या पाणथळ जमिनीतून मानवी वसाहतीत आला असावा, असा अंदाज डब्ल्यूडब्ल्यूए संस्थेचे अध्यक्ष आदित्य पाटील यांनी दिला, पण फ्लेमिंगो पक्षी मानवी वसाहतीतीत रस्त्यावर एकटा येणं ही घटना अभावानेच घडते. आपणही अशी घटना पहिल्यांदाच पाहिल्याचे आदित्य पाटील यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community