भारतीय रेल्वेने प्रवास केला नाही असे लोकं अगदी मोजकेच असतील. पण, दैनंदिन आयुष्य जगत असताना रेल्वे प्रवास हा एकदा न एकदा करावाच लागतो. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. काही लोक एकटे प्रवास करतात, तर काही आपल्या कुटुंबासोबत. अनेकदा घाई गडबडीत आपण आपले तिकीट घरी विसरतो किंवा ते आपल्याकडून हरवते किंवा ट्रेनची वेळ झाल्याने आपण ते काढायचं टाळतो. अशा वेळेस आपल्यावर विनातिकीट प्रवास करण्याची पाळी येते. विनातिकीट प्रवास करताना आपण पकडले तर जाणार नाहीना? अशी भिती सतत आपल्या मनामध्ये असते आणि आपण पकडलेच जातो. पण असा प्रवास करणाऱ्या लोकांमुळे मध्य रेल्वे श्रीमंत होत असल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेने विनातिकीट तसेच बुक न केलेल्या सामानासह अनियमित प्रवासाविरुद्ध सुरू ठेवलेल्या मोहिमेमुळे फेब्रुवारी २०२२ मध्ये ३.४१ लाख प्रकरणे आढळून आली आहेत आणि त्यातून रु. २०.८८ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
भारतीय रेल्वेत मध्य रेल्वेचा महसूल सर्वाधिक
एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत विनातिकीट/बुक न केलेल्या सामानासह अनियमित प्रवासाची एकूण ३१.१० लाख प्रकरणे आढळून आली आणि त्यातून रु. १८६. ५३ कोटींचा महसूल प्राप्त झाला जो सर्व क्षेत्रीय रेल्वेमधील महसुलाच्या बाबतीत सर्वाधिक आहे. मोहिमेदरम्यान, कोविडचे योग्य वर्तन न पाळणाऱ्या आणि मास्क न परिधान करणाऱ्या ५२, ७६५ व्यक्ती आढळून आल्या आणि त्यांच्याकडून रु. ८४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.
(हेही वाचा – रेल्वे स्थानक परिसरात धूम्रपान करताय? सावधान! नाहीतर…)
मध्य रेल्वेने मारली बाजी
भारतीय रेल्वेचा पार्सल वाहतुकीतून सर्वाधिक महसूल मिळविण्यामध्ये मध्य रेल्वेने बाजी मारली आहे. मध्य रेल्वेने फेब्रुवारी-२०२२ या महिन्यात पार्सल वाहतुकीतून २८.१६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहेत. एप्रिल-२०२१ ते फेब्रुवारी-२०२२ या कालावधीत मध्य रेल्वेने पार्सल वाहतुकीतून २८८ कोटी मिळवले जे मागील वर्षी याच कालावधीत प्राप्त झालेल्या १३१.३४ कोटींच्या महसुलापेक्षा ११९ टक्के अधिक आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने ( Central Railway ) सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्ये पार्सल महसूलात आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे.
(हेही वाचा – रविवारी ‘या’ मार्गावर जाऊ नका! मेगाब्लॉक असणार आहे)
Join Our WhatsApp Community