समुद्र किनाऱ्यांवर फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांसाठी सार्वजनिक शौचालयांची मोठी समस्या असून चौपाट्यांवर शौचालय बांधण्याची मागणी मोठ्याप्रमाणात होत आहे. त्यामुळे मुंबईतील सात समुद्र चौपाट्यांवर आता सार्वजनिक शौचालयाची उभारणी केली जाणार आहे. याअंतर्गत तब्बल २७ शौचालये बांधली जाणार आहे. ज्यामुळे चौपाट्यावर फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांना यामाध्यमातून सुलभ सुविधा प्राप्त होणार आहे.
प्रत्येक शौचालयासाठी सुमारे १२ लाख खर्च होणार
केंद्र शासनामार्फत राबवण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई शहाराला हागणारीमुक्त दर्जा देण्यात आला आहे. तसेच ओडीएफ डबल प्लस दर्जा प्राप्त करण्यासाठी महापालिकेच्यामाध्यमातून विविध योजना राबवल्या जातात. या योजनेतंर्गत समुद्र किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधांकरता शौचालये उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून राष्ट्रीय हरित न्यायासनाने नेमून दिलेल्या समुद्र चौपाटींवर ही शौचालये बांधली जाणार आहेत. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये एस.एस. एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीला विविध करांसह ३ कोटी ३३ लाख ३० हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. सौर ऊर्जा यंत्रणेसह उभारण्यात येणाऱ्या या प्रत्येक शौचालयासाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.
…म्हणून केली जात होती मागणी
जुहू चौपाटीवर सकाळच्या वेळेस फिरण्यास येणाऱ्या लोकांना सार्वजनिक शौचालयांची सुविधा नसल्याने विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन अशाप्रकारची सुविधा देण्याची मागणी केली होती. आज लोकांची जीवनशैली बदली असून बदलत्या जीवनशैलीनुसार मधुमेह, उच्च रक्तदाब आदींसारखे आजार उद्भवतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तीला सातत्याने लघुशंकेला जावे लागते. त्यामुळे चौपाटीवर या सुविधा देण्याची मागणी अनेकदा होत आहे. याबाबत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्था विभागाच्या उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांच्याशी संपर्क साधला शासनाच्या नियमांनुसार या शौचालयांची उभारणी करणे बंधनकारक आहे, त्यानुसार या शौचालयांची उभारणी केली जात असल्याचे सांगितले. राष्ट्रीय हरित लवादाच्या सुचनांनुसार या शौचालयांची सुविधा देण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा- केंद्र सरकार घसरतंय… शरद पवारांचं मोठं विधान!)
या चौपाट्यावर मिळणार सुलभ सुविधा
- गिरगाव चौपाटी : ०२ शौचालय
- दादर-माहिम चौपाटी : ०८ शौचालय
- जुहू चौपाटी : ०८ शौचालय
- वर्सोवा चौपाटी : ०४ शौचालय
- वर्सोवा विस्तारीत चौपाटी : ०१ शौचालय
- मढ मार्वे चौपाटी : ०२ शौचालय
- मनोरी, गोराई चौपाटी : ०२ शौचालय
प्रत्येक शौचालय सात आसनी
- पुरुषांसाठी ३ आसने
- स्त्रियांसाठी ३ आसने
- शारिरीक दुर्बलांसाठी १ आसन