मुंबईतील वाहतुकीच्या रेल्वे पूल व उड्डाणपूलांची कामे हाती घेण्यात आली असून या पुलांची रंगरंगोटीवर आता भर दिला जाणार आहे. केवळ पुलांची रंगरंगोटी नव्हेतर पुलांच्या खालील भागांमधील भिंतीवर चित्रेही रेखाटत त्यांच्या सौंदर्यात भर पाडली जाणार आहे. पुलांच्या या मेकअपवर तब्बल विविध करांसह तब्बल साडेसहा कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या रंगरंगोटी व भिंती चित्रांसाठी मिरा-भाईंदर महापालिकेत काम करणाऱ्या एका कंपनीची वर्णी लावली गेली आहे. विशेष म्हणजे हे तातडीने होणे आवश्यक असतानाही पावसाळा वगळून १८ महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणार आहे.
(हेही वाचा- चौपाट्यांवर आता सुलभ सुविधा: पर्यटकांची मोठी प्रतीक्षा संपणार)
महापालिकेच्या सौंदर्यात भर घालण्याचा निर्णय
मुंबईतील शहर भागातील महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ३३ विद्यमान पुलांना सौंदर्यात्मक रंगरंगोटी आणि भित्ती चित्रांचे काम करून महापालिकेच्या सौंदर्यात भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शहर भागातील विविध विद्यमान पुलांची रंगरंगोटी आणि भित्ती चित्रांचे काम करण्यात येत असून यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये १६ कंपन्यांनी भाग घेतला होता. यामध्ये सुमती सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून या कंपनीने यापूर्वी मिरा भाईंदर महानगरपालिकेत विविध कामे केलेली आहेत.
पुलांच्या भिंतीही बोलक्या होणार
या कामांमध्ये प्रत्येक पुलाच्या भिंती आकर्षक रंगांनी रंगवल्या जाणार आहेत, आणि त्या पुलावरील भिंतीच्या दर्शनी भागांवर भित्तीचित्रे रेखाटली जातील. ज्यामुळे या पुलांच्या भिंतीही बोलक्या होऊन आसपासच्या परिसराच्या सुशोभिकरणातही भर पडेल. यामुळे पुलाचे सौंदर्यही वाढेल, असा विश्वास पूल विभागाचे प्रमुख अभियंता सतीश ठोसर यांनी व्यक्त केला.
या पुलांच्या भिंती होणार बोलक्या
वाय.एम. पूल, मरिन ड्राईव्ह प्रिन्सेस स्ट्रीट पूल,केम्स कॉर्नर, नेपियन सी रोड केम्स कॉर्नर पूल, फॉकलँड पूल, ऑपेरा हाऊसजवळी फ्रेंच पूल,ग्रँट रोड पूल, ऑपेरा हाऊस पूल, केनेडी पूल, बेलासीस पूल, भायखळा ग्लोरिया चर्च, भायखळा पूल, वाय पूल, ऑलिव्हटं पूल, रे रोड पूल, चिंचपोकळी ऑर्थर पूल, दादरमधील जगन्नाथ शंकर शेठ पूल, शीव कोळीवाडा जीटीबी नगर, शीव रुग्णालय पूल, वडाळयातील नाना फडणवीस पूल, माटुंगा तुळपुले उड्डाणपूल, नाथालाल डी मेहता उड्डणपूल, परेल टी टी पूल, करीरोड स्थानक पूल, लालबाग संत ज्ञानेश्वर पूल, दादर पश्चिम केशवसूत पूल, माटुंगा पश्चिम टी.एच. कटारिया पूल, महालक्ष्मी पूल, लोअर परळ पूल, हिंदमाता पूल आदी पुलांचा समावेश आहे.