मुंबईत हिंदमातामध्ये पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या ही नित्याचीच झाली असली, तरी त्यावर यशस्वी मात करण्याच्या झालेल्या प्रयत्नामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळे हिंदमाताचा हा उतारा आता मिलन सब वेच्या जागी लागू केला जाणार आहे.
भूमिगत टाक्या बनवून पाण्याचा निचरा करण्याच्या हिंदमाता फॉर्म्युल्याचा वापर मिलन सब-वेच्या ठिकाणी करण्यात येत असून, ज्या कंत्राटदाराने हिंदमाता परिसराचे काम केले होते, त्यांच्यावरच मिलन सब-वेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या उताऱ्यासाठी सुमारे ३३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
(हेही वाचाः ड्रीम मॉलमध्ये गर्दुल्ल्यांचा वावर! भाजप नगरसेविकेचा आरोप)
मिलन सब-वेवर तुंबते पाणी
पश्चिम उपनगरातील पावसाळ्यात सर्वात जास्त पाणी तुंबण्याचे प्रमुख ठिकाण म्हणजे मिलन सब-वे. याठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे बऱ्याचदा वाहनांचा मार्ग बदलावा लागतो. त्यामुळे हिंदमाताच्या धर्तीवर मिलन सब-वेमधील पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या निवारण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
असा केला जाणार निचरा
मिलन सब-वेमधील तुंबणाऱ्या पाण्यासाठी के-पश्चिम विभागातील आरक्षित भूखंडावर तात्पुरत्या स्वरुपात पाणी साठवण्यासाठी साठवण टाकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. मिलन सब-वेमध्ये साचणारे पाणी साठवण टाकीपर्यंत वाहून नेण्यासाठी १२०० मिमी. व्यासाची पावसाळी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. ज्याद्वारे पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा जलद गतीने होईल आणि मिलन सब-वेमधील पाणी साचण्याचे प्रमाण कमी होईल. त्यानंतर त्या भूखंडावर बांधण्यात येणारी २० हजार लिटर घनमीटर म्हणजे २ कोटी लिटर क्षमतेची साठवण टाकी आरसीसी स्लॅबने आच्छादित करून भूखंडाची जागा नियमित वापरासाठी असेल, असे पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचाः कांजूर,नाहूर,भांडुपकरांसाठी नवीन रुग्णालय! वाराणसीच्या कंत्राटदारावर सोपवली जबाबदारी)
इतक्या रुपयांचे कंत्राट
या कामासाठी मागवलेल्या निविदेमध्ये देव इंजिनिअर्स ही कंपनी पात्र ठरली. विशेष म्हणजे ही निविदा २४ फेब्रुवारी रोजी मागवण्यात आली आणि २८ फेब्रुवारी रोजी अंतिम करण्यात आली. यामध्ये देव इंजिनिअर्स यांनी महापालिकेच्या अंदाजापेक्षा २० टक्के कमी दरात काम मिळवले आहे. त्यामुळे निव्वळ कंत्राट २७.७३ कोटी आणि विविध करांसह ३३.९० कोटी रुपयांमध्ये कंत्राट दिले जात आहे. याचे कंत्राट अवघ्या ८ दिवसांमध्ये अंतिम करून २ मार्च रोजी याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला.
वाहतूक कोंडी कमी होणार
या कामांसाठी पात्र ठरलेल्या देव इंजिनिअर्स या कंपनीने यापूर्वी हिंदमाता उड्डाणपुलाखाली संत झेविअर्स मैदानातील साठवण टाकीचे बांधकाम, पंपासाठी तयार केलेल्या खड्ड्यातील पाणी संकलन प्रणाली आणि पाणी बाहेर टाकण्यासाठी जलवाहिनी व त्यासंदर्भातील कामे केलेली आहेत. या अनुभवाच्या आधारे या कंपनीला मिलन सब-वेचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यास हिंदमाताप्रमाणे मिलन सब-वेमधील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होईल. ज्यामुळे पाणी तुंबल्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता फारच कमी असेल, असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
Join Our WhatsApp Community