मुंबईतील अवयवदानाला तरुणांची पाठ! रुग्णासाठी चंदीगढहून आणले हृदय

राज्यात आता थेट पंजाब आणि चंदीगढहून अवयवदान होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे.

97

गेल्या तीन वर्षांपासून मुंबईत केवळ वयोवृद्धांकडून मृत्यूपश्चात अवयवदानासाठी पुढाकार घेतला जात असताना, यंदाच्या वर्षीही पन्नाशी ते सत्तरीतील वृद्धांनीच अवयवदानात सहभाग नोंदवला आहे. तरुणांकडून मुंबईत अवयवदानासाठी प्रतिसाद मिळत नसताना गेल्या आठवड्याअखेरीस थेट चंदीगढच्या तरुणाचे हृदय मुंबईतील गरजू रुग्णाला मिळाले. राज्यात आता थेट पंजाब आणि चंदीगढहून अवयवदान होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे.

मुंबईत एकाही तरुणाने केले नाही अवयवदान

चंदीगढच्या २० वर्षीय तरुणाने मृत्यूनंतर आपले हृदय मुंबईच्या गिरगाव येथील एच एन रिलायन्स रुग्णालयातील गरजू रुग्णाला प्रत्यारोपणासाठी दिले. याबाबत रुग्णालयाने रुग्णाबाबतची माहिती कुटुंबीयांच्या परवानगीनंतरच दिली जाईल, अशी माहिती दिली. अवघ्या विशीतल्या चंदीगढच्या तरुणाचे हृदय मुंबईकराला मिळालेले असताना, यंदाच्या वर्षात एकाही मुंबईकर तरुणाकडून अवयवदान झालेले नाही. मुंबईत आतापर्यंत झालेल्या सात अवयवदानांत एकाही तरुणाची नोंद झालेली नाही.

(हेही वाचाः नेमबाजी विश्वचषकात सावरकर रायफल क्लबची रुचिता विनेरकर ठरली ‘सुवर्णकन्या’!)

अवयवदानाची प्रक्रिया होत नाही

मुंबईत अपघाती मृत्यूत मोठ्या संख्येने तरुणांचा भरणा आहे. सायन द्रुतगती मार्गावर होणा-या अपघाती मृत्यूंमध्ये तरुणांची नोंद जास्त दिसून येते. हे मृतदेह पालिका रुग्णालयांत आणले जातात. त्यावेळी कुटुंबीयांची अवयवदानासाठी समजूत घालत अवयव प्रत्यारोपण समन्वयकांकडून अवयवदानाची प्रक्रिया पार पडण्याची प्रक्रिया होत नाही, असे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

सरकारी रुग्णालयांमध्ये अवयवदान थंडावले

प्रत्येक खासगी व सरकारी, पालिका रुग्णालयांत रुग्णाकडून मृत्यूपश्चात अवयवदान केले जावे, म्हणून नियुक्त केलेल्या अवयव प्रत्यारोपण समन्वयकांकडून मिळणा-या अवयवदानाची संख्या अत्यल्प आहे. त्यामुळे जनजागृती पालिका आणि सरकारी रुग्णालयांमध्ये अवयवदान थंडावल्याचे निराशाजनक चित्र आहे. मुंबईत यंदाच्या सातही अवयवदानांत खासगी रुग्णालयांनीच अवयवदानासाठी पुढाकार घेतला आहे.

(हेही वाचाः १० वर्षीय मुलीवर अत्याचार करणा-याला नराधमाला झाली ‘इतकी’ शिक्षा)

मुंबईतील यंदाचा अवयवदान तपशील

१८ जानेवारी – अपोलो रुग्णालय , नवी मुंबई – ५२ वर्षीय महिला – महिला रुग्णाने मृत्यूपश्चात यकृत दान केले. मूत्रपिंडे, हृदय आणि फुफ्फुस वैद्यकीय तपासणीत प्रत्यारोपणासाठी सक्षम नसल्याने या अवयवांचे दान करता आले नाही.

२३ जानेवारी – एच एन रिलायन्स रुग्णालय, गिरगाव – ५१ वर्षीय पुरुष – रुग्णाने यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान केली. मात्र हृदय वैद्यकीय तपासणीत प्रत्यारोपणासाठी सक्षम नसल्याने दान करता आले नाही.

२६ जानेवारी – एच एन रिलायन्स रुग्णालय. गिरगाव – ४७ वर्षीय पुरुष – या पुरुषाने मृत्यूपश्चात हृदय, यकृत, मूत्रपिंडे यांसह नेत्रदानही केले.

२९ जानेवारी – बॉम्बे रुग्णालय. चर्चगेट – ७७ वर्षीय पुरुष – यकृत आणि दोन मूत्रपिंडे या रुग्णाकडून दान केली गेली. परंतु दोन्ही मूत्रपिंडे प्रत्यारोपणासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणीत सक्षम नसल्याचे आढळून आले.

३० जानेवारी – अपोलो रुग्णालय, वाशी – ५५ वर्ष परुष, – यकृत आणि एक मूत्रपिंड या रुग्णाने दान केली.

९ फेब्रुवारी – जसलोक रुग्णालय, ताडदेव – ७० वर्ष पुरुष – यकृत आणि दोन मूत्रपिंडे या रुग्णाने दान केली.

४ मार्च – जसलोक रुग्णालय, ताडदेव – ७० वर्ष पुरुष – या रुग्णाने यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.