रात्रीच्या वेळेस सुरू होणारे ‘बेस्ट’ बसमार्ग दिले कंत्राटदारांना?

93

बेस्ट उपक्रमाने रात्री १२ ते सकाळी ५ वाजेपर्यंत अविरत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ७ मार्चपासून करण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वेगाड्या बंद झाल्यानंतर रुग्णालये, विमानतळ, हॉटेल्स अशा ठिकाणी रात्री अपरात्री कामानिमित्त घराबाहेर असणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, तसेच त्यांना त्यांच्या घरी पोहोचता यावे याकरिता ‘बेस्ट’ने रात्री १२ ते सकाळी ५ या वेळेत काही विशेष बस फेऱ्यांचे आयोजन केले आहे. बस मार्ग क्रमांक १, ६६ मर्यादित, २०२ मर्यादित, ३०२, सी ३०५ आणि ४४० मर्यादित या सर्व बस मार्गांवर प्रति तासाला एक बस याप्रमाणे बसगाड्या प्रवर्तीत करण्यात येणार आहेत.

कंत्राटदारांना मुभा

वरील सर्व बसमार्ग ‘बेस्ट’ने नुकतेच खासगी कंत्राटदाराला बहाल केलेल्या ‘प्रतीक्षानगर’ आगारातून चालवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ह्या विशेष फेऱ्यांवर धावणाऱ्या बसगाड्या या बेस्टच्या स्वमालकीच्या नसून ‘मातेश्वरी ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ ह्या कंत्राटदाराला वरील सर्व बसमार्गांवर त्याच्या बसगाड्या प्रवर्तीत करण्याची मुभा देण्यात आलेली आहे, असा आरोप आपली बेस्ट आपल्यासाठी या समितीने केला आहे. ‘मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ ह्या कंत्राटदाराच्या आस्थापनेची कायदेशीर नोंदणी ही १३ जुलै २०२० रोजी फक्त रुपये १० लाख इतक्या कमी भाग भांडवलावर झालेली असून सप्टेंबर २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात या बसगाड्या प्रतीक्षानगर आगारात दाखल झालेल्या आहेत. बेस्टकडे आतापर्यंत टाटा मोटर्स लिमिटेड, डागा ग्रुप, हंसा सिटी बस, ऑलेक्ट्रा, मधुकर पाटील ग्रुप अशा ५ कंत्राटदारांच्या बसगाड्या धावत आहेत. त्यातल्या त्यात ‘मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ ह्या कंत्राटदारालाच बेस्टने इतक्या मोठ्या प्रमाणात बसगाड्या चालवण्याचे कंत्राट कसे काय दिले? मुळातच हा कंत्राटदार अतिशय नवखा असून त्याच्याकडे या आधी भाडेटप्पा बस वाहतूकीचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना अशा नवख्या कंत्राटदारांवर बेस्ट समिती आणि बेस्ट प्रशासन नेमके कोणाच्या राजकीय मर्जीखातर मेहेरनजर दाखवत आहे, असा सवाल आपली बेस्ट आपल्यासाठी या समितीने केला आहे.

( हेही वाचा : मुंबईतील अवयवदानाला तरुणांची पाठ! रुग्णासाठी चंदीगढहून आणले हृदय )

जबाबदारी कोण घेणार?

रात्रीच्या वेळी, कंत्राटदारांच्या बसेसमुळे विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या प्रश्न उद्भवू शकतो. खाजगी बसगाड्यांच्या रात्रीच्या फे-यांमधून उद्या दिल्ली सारखंच एखादं ‘निर्भया’ प्रकरण घडलं, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची असा संतप्त प्रश्न प्रश्न महिला प्रवाशांतर्फे विचारला जात असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या प्रयत्नाने कंत्राटी बससेवा सुरु झाल्याचे म्हटले आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये मात्र या विषयी तीव्र नाराजीचा सूर आहे. या कंत्राटदाराबद्दल शिवसेनेला इतका पुळका का?, असा थेट प्रश्न कर्मचाऱ्यांनी विचारलेला आहे. हा कंत्राटदार खरंच ‘मातेश्वरी’ आहे की ‘मातोश्री’ अशी काहीशी चर्चा प्रत्येक आगारांतील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे, असे ‘आपली बेस्ट आपल्यासाठी’ या समितीने म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.