नवाब मलिकांची आता आर्थर रोड तरूंगात रवानगी

114

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना आजही दिलासा मिळालेला नाही. ईडीने १३ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर आता पुन्हा त्यांना मुंबईच्या पीएमएलए न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर २१ मार्चपर्यंत कारागृहात ठेवण्याचे आदेश मुंबईत सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळताच आता मलिकांची रवानगी मुंबईतील ताडदेव येथील ऑर्थर रोड तरूंगात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

विरोधकांकडून मलिकांच्या राजीनाम्याची मागणी

दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२ सुरू झाल्यापासून विरोधकांकडून नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत आहे. यासाठी विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधक आंदोलन करताना दिसतायत. दाऊदच्या दलाल मंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशी पोस्टबाजीकरून भाजपकडून सातत्याने मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

(हेही वाचा – नवाब मलिक गर्दुल्ले आहेत! मोहित कंबोजांनी दाव्यासह केला आरोप)

‘या’ आरोपांखाली मलिक ईडीच्या रडारवर

  • १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून मलिकांचे पुत्र फराज मलिकांकडून जमीन खरेदीचा आरोप
  • कुर्ल्यातील मोक्याची ३ एकर जागा मलिकांचे पुत्र फराज मलिकांनी खरेदी केल्या
  • ३० लाखांतील जमीन खरेदीपैकी २० लाखांचं पेमेंट केल्याचा मलिकांवर आरोप
  • मलिक कुटुंबीयांच्या सॉलिडस कंपनीनं २००५ मध्ये शहावली आणि सलीम पटेलांकडून व्यवहार केल्याचा आरोप आहे
  • २००५ मध्ये कुर्ल्यातील जमिनीचा भाव २०५३ रु. स्क्वेअर फूट होता मात्र खरेदी २५ रु. स्वेअर फुटांनी केली.
  • जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी सलीम पटेलच्या नावावर, विक्री सरदार शहा वलीच्या नावावर तर कागदपत्रावरील सही फराज मलिक यांची आहे.

मलिकांना जामीन मिळणार की नाही?

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध आणि मनी लॉंड्रिंगप्रकरणात नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारीला ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने दोन वेळा नवाब मलिकांचा रिमांड घेतला होता. मात्र आज नवाब मलिकांना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीने मलिकांना ईडी कोठडीची गरज नसल्याचे सांगत न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यानुसार ईडीच्या विशेष न्यायालयाने नवाब मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. २१ मार्चपर्यंत मलिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. यानंतर न्यायालयाची रितसर कॉपी हातात आल्यानंतर नवाब मलिकांचे वकील जामीनासाठी अर्ज दाखल करू शकतात. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत नवाब मलिकांच्या जामीन मिळतो की नाही? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.