स्त्री म्हणजे जन्मदाती …
स्त्री म्हणजे संस्कृती…
स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा…
स्त्री म्हणजे घराच घरपण…
स्त्री म्हणजे महान कार्य…
आज ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा….
आजची स्त्री ही कुणापेक्षाही कमी नाही, कोणत्याही कामात ती मागे नाही. चुल आणि मुल सांभाळून ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करुन देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या ‘राजमाता जिजाऊ’, ‘मै मेरी झांशी कभी नही दुंगी’ असे ठमकावून इंग्रजांशी संघर्ष करणारी ‘राणी लक्ष्मीबाई’ आणि स्त्री शिक्षणाची महती ओळखून मुलींना, स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करुन देणाऱ्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’, आकाशात भरारी घेणाऱ्या ‘कल्पना चावला’ यांच्या सारख्या सर्व कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वंदन…. या दिवसाची खरी सुरुवात स्त्रियांच्या सामुहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 मध्ये झाली.
अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभराच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्यापरीने संघर्ष करीत होत्या. त्यामध्ये ‘क्लारा झेटकिन’ या कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली. 8 मार्च 1908 मध्ये न्युयॉर्कमधील कपडयाच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांना काम जास्त पण मजुरी कमी मिळायची या कारणामुळे त्यांनी लढा पुरकारला, दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता तसेच मतदानाचा हक्क मिळावा, अशा मागण्याही जोरकसपणे केल्या. स्त्रियांनी संघटित होऊन स्वत:चा अधिकार मागण्यासाठी केलेला हा संघर्ष जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो. 8 मार्च 1908 या दिवसाला ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ‘जागतिक महिला दिन’ म्हणून स्विकारावा, असा जो ठराव मांडला तो पास होऊन त्याला मान्यता मिळाली. आपल्या भारत देशात 8 मार्च 1943 रोजी मुंबई येथे पहिल्यांदा महिला दिवस साजरा करण्यात आला.
तुझ्या उत्तुंग भरारी पुढे…
गगन ही ठेंगणे भासावे…
तुझ्या विशाल पंखाखाली…
विश्व ते सारे वसावे…
स्त्री एक अगाध शक्तीचे रुप
जचा हा दिवस सन्मानाचा, अभिमानाचा दिवस असून तो उत्साहाने साजरा केला जातो. सर्वत्र कर्तृत्ववान आणि समाजात मोलाचे काम करणाऱ्या तसेच गृहोद्योग चालविणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले जाते. आपल्या संस्कृतीमधील स्त्रीचे समाजातील दुय्यमस्थान काही अंशी अस्पष्ट होत आहे. आज भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे. असं एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रामध्ये महिलेने प्रवेश केला नाही. शेतातील मजुरापासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत तसेच सरपंचापासून पंतप्रधान पदापर्यंत शिक्षिका, डॉक्टर, पोलिस, पोलीस निरीक्षक, तलाठी, ग्रामसेविका, पायलट, खेळाडू अशा अनेक क्षेत्रात मजल मारत महिलांनी कर्तृत्व सिध्द केले आहे. आपल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती पदी निवड झालेल्या महिला प्रतिभाताई पाटील, पोलीस सेवेत अधिकारी असलेल्या किरण बेदी, भारतरत्न किताबाच्या मानकरी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, पी.टी.उषा सारख्या अनेक महिलांनी क्रिडाक्षेत्रात उच्चतम कामगिरी केली, मेधा पाटकर सारख्या अनेक महिलांनी सामाजिकतेचा वसा घेतला तसेच कल्पना चावला सारख्या अनेक महिलांनी विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्र पादाक्रांत करुन असामान्यत्व सिद्ध केले. अशा अनेक महिलांनी विविध क्षेत्रात आपले नाव कमावले आहे.
स्त्री शिक्षणाचा वारसा हाती घेतलेल्या महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्वत: शिकून वारसा चालविला. सिंधूताई सपकाळ यांनी अनेक अनाथ मुलांच पालकत्व स्विकारुन अनेक मुलांच्या माई बनल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेतांना परिक्षा फी भरण्यासाठी त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी कष्ट करुन पैसे कमविले, अशी अनेक उदाहरणे पुरुषांच्या यशामागे स्त्रीयांचा वाटा दर्शवितात. आपल्या इतिहासात ‘हिरकणी’ सारखी एक आई होऊन गेली, जी स्वत:च्या बाळाच्या प्रेमापोटी रायगडाचा उभा कडा उतरुन आली. ‘झाशीची राणी’ होऊन गेली जी बाळ पाठीवर बांधून लढली, त्यावरुन स्त्री एक अगाध शक्तीचे रुप आहे हे समजते.
तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार…
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे, तुझा संसार…
कर्तृत्व अन् सामर्थ्याची ओढून घे नवी झालर…
स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर…
पण आजही खरचं स्त्री स्वतंत्र झाली आहे का ? हा प्रश्न समाजमनाला अंतर्मुख होण्यास भाग पाडतो हेही तितकेच खरे आहे. महिलांवर अबला म्हणून अत्याचार करणारे कधी सुधारतील? आजही समाजात स्त्री असुरक्षित आहे. लैंगिक शोषण, अत्याचार या गोष्टीमुळे स्त्रीयांचे, मुलींचे जीवन धोक्यात येत आहे. आज ही समाजात मुलींना जन्म देतांना विचार केला जातो. मुलींचा तिरस्कार केला जातो. असा अत्याचार करणाऱ्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की ती महिला कुणाची तरी आई, बहिण किंवा मुलगीचं आहे. स्त्री-पुरुष समानता ही समाजात आचरणात आणायला हवी. प्रत्येक स्त्री ही समाजता स्वत:ची ओळख निर्माण करीत आहे. त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. आपण अशा स्त्रियांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कुंटुंबातील केवळ निर्णय तिच्यावर थोपविण्याऐवजी निर्णय घेण्यात तिला सुद्धा सामिल करुन घ्यायला हवे. स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासून करायला हवी. तरचं आपला भारत देश सुरक्षित, सक्षम आणि बलवान होईल.
तोडून सारे बंधने तू झेप घे आकाशी..
लाख संकटे येऊ देत घाबरु नको तू त्याशी…
जरी परंपरांच्या साखळ्यांनी केले असेल बंदिस्त तूला
तरी या साखळ्या तोडून घे उंच भरारी आकाशी,
ताऱ्याप्रमाणे चमक आणि फुलासारखी बहर….
दहाही दिशा काबिज कर…
उडाण भर तुझी उंच उंच या आकाशी…
जागतिक महिला दिन फक्त एका दिवसापुरतं मर्यादित न ठेवता रोजच आपण महिलांना सन्मानपुर्वक वागणूक दिली पाहिजे व यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. पुरुषांनी स्त्रीयांचा अधिकार मनाने स्विकारला… तिचे महत्त्व ओळखले….. तरच हा जागतिक महिला दिन साजरा केल्याचे सार्थक होईल.
(लेखिका – कविता फाले-बोरीकर)
Join Our WhatsApp Community