पक्षपात, भेद मोडण्यासाठी प्रत्येक महिलेने पुढे यावे !

128

अनिष्ट रूढी आणि परंपरेने सुरू असलेले अत्याचार झुगारून, आता प्रत्येक महिलेने पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी एका महिलेने दुसऱ्या महिलेला साथ दिल्यास निश्चितच महिला सक्षम होतील, असे आवाहन अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर केले आहे.

महिलेने यशस्वी झालेच पाहिजे

दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संघर्षातून पुढे आलेल्या, यशस्वी झालेल्या वेगवेगळ्या क्षेत्रात नाव उज्ज्वल केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात येतो. परंतु केवळ एक दिवस महिलांचा सन्मान करून महिला सक्षम होणार नाहीत तर त्यासाठी प्रत्येक महिलांनी स्वतःला सिद्ध करण्याची गरज असल्याची बाबही त्यांनी नमूद केली. जागतिक महिला दिनानिमित्त ‘पक्षपात मोडा’ ही आंतरराष्ट्रीय थीम असून, यात प्रत्येक महिलेने यशस्वी झाले पाहिजे. महिलांनी पक्षपात मोडत असल्याचे आणि संघर्षांचे स्वतःचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करावेत, असेही जागतिक संघटनेने महिलांना आवाहन केले आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिला ही दररोज आणि सर्व दिवस तिच्या स्वतःच्या विचार आणि कृतीसाठी जबाबदार असल्याचेही नमूद केले आहे.

तर निश्चित मदत होईल

अमरावती जिल्ह्याला कर्तबगार महिलांचा वारसा असून त्यांचा आदर्श घेण्यासाठी इतर महिलांनी पुढे यावे. आजही अमरावती जिल्ह्यातील बऱ्याच महिला स्वतः संघर्ष करत आहेत. मेळघाट सारख्या दुर्गम भागातही महिलांना मोठ्या प्रमाणात आरोग्य आणि शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. यासाठी जिल्ह्यातील इतर महिलांनी पुढे आल्यास त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी निश्चित मदत होईल, अशी मला खात्री असल्याचं  जिल्हाधिकारी म्हणाल्या.

( हेही वाचा International Women’s Day: महिलांनीच महिलांना विचारावेत ‘हे’ प्रश्न! )

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

राष्ट्रीय पोषण माह उपक्रमात उत्कृष्ट काम केल्याबद्दल अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्र राज्यात दोन पुरस्कार प्राप्त झाले असून, सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला व बाल विकास मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बाल विकास यांना गौरवण्यात येणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.