मुंबईतील पुनर्वसन रखडलेल्या 523 झोपडपट्ट्यांसाठी आव्हाडांची विधानसभेत ‘ही’ घोषणा

137

मुंबईतील पुनर्वसन रखडलेल्या 523 झोपडपट्ट्यांसाठी ॲमिनिटी स्कीम सरकारकडून तयार करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या अंतिम मंजूरीसाठी ही फाईल गेली असून दोन दिवसात याबाबत निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली. कुर्ला पश्चिम येथील प्रिमियम कंपनीच्या जिगेवरील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थितीत करण्यात आला होता. या प्रश्नावर उपप्रश्न विचारताना भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबईतील अशा रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांकडे सरकारचे लक्ष वेधले.

सरकार काय प्रयत्न करणार?

झोपडपट्टी पुनर्वसनाच्या 40% हुन अधिक योजना अशाच रखडल्या असून यातील बिल्डर ईडी, पोलीस, आर्थिक गुन्हे शाखा यांच्या विविध चौकशांमध्ये अडकले आहेत. काहीजण कारागृहात आहेत. त्यामुळे झोपडपट्टीवासीयांची ससेहोलपट सुरु आहे. मुळ घर तोडले गेले, बिल्डरकडून दोन वर्षांनंतर पुढचे भाडे मिळणे बंद झाले त्यामुळे त्यांना आता कोणी वाली उरलेला नाही. अशावेळी सरकारने याबाबत काहीतरी योजना तयार करुन अशा झोपडपट्टीधारकांना भाडे कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे तसेच पुनर्वसनाचे घर त्यांना मिळावे यासाठी सरकार काय प्रयत्न करणार? असा प्रश्न आमदार अँड आशिष शेलार यांनी विचारला.

(हेही वाचा – वीज कंपन्या डबघाईस! पण फटका शेतकऱ्यांनी का? बावनकुळेंचा सवाल)

या योजनेचा फायदा पुनर्वसन योजनांना होणार

त्यावर उत्तर देताना गृहनिर्माण मंत्र्यांनी या रहिवाशांना ॲमिनिटी स्कीम तयार करण्यात आल्याचे सांगत या योजनेचा फायदा 523 झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना होईल असेही त्यांनी सांगितले. ही फाईल गृहनिर्माण विभागाकडून मुख्य सचिवांकडून मंजूर होऊन मुख्यमंत्र्यांकडे अंतिम मंजूरीसाठी गेली असून येत्या दोन दिवसात त्यावर स्वाक्षरी होणे अपेक्षित असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.