पुण्यात पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन! राज ठाकरे काय बोलणार?

162

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचा चांगलाच वेग प्राप्त झाला आहे. सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांचे दौरेही सुरु झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जागा मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे.त्यानिमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नियोजनाला सुरुवात केली आहे. त्यातच उद्या, बुधवारी ९ मार्च रोजी मनसेचा वर्धापनदिन आहे. यंदा मनसेचा वर्धापनदिन पुण्यात साजरा होणार आहे. त्यामुळे आजपासून तीन दिवस राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे उद्याच्या सभेत काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंनी शिवसेनेमधून बाहेर पडल्यावर २००६ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आज या पक्षाला १५ वर्ष पूर्ण होऊन, उद्या १६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या मागील १६ वर्षात मनसेने अनेक चढ उतार पाहिले आहेत. पण दरवर्षी मुंबईत होणारा वर्धापन यंदा प्रथमच पुण्यातील होणार आहे. मार्चच्या नऊ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातून मनसेचा वर्धापनदिन जल्लोषात साजरा केला जातो. दरवर्षी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत कार्यक्रम असतो. पण यंदा १६ वा वर्धापनदिन पुणे येथे साजरा होणार आहे. राज्यभरातून असंख्य मनसैनिक आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

(हेही वाचा –  यंदा मनसेचा वर्धापन दिन पुण्यातच का? जाणून घ्या कारण)

कुठे होणार मनसेचा वर्धापनदिन सोहळा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापनदिन सोहळा पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्र, नेहरू स्टेडीयम शेजारी, स्वारगेट, पुणे येथे होणार आहे. यापार्श्वभूमीवर मनसेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांचा भव्य मेळावा होणार आहे.

मनसैनिक वर्धापनदिन सोहळ्यांसाठी सज्ज

मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार असून राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक सह प्रमुख महानगरपालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेला या मेळाव्यास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मेळाव्या करीता नाशिक शहरासह जिल्ह्यातील सर्व १५ विधानसभा मतदारसंघांतून तालुका अध्यक्षांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने वाहने निघणार असून प्रत्येक वाहनांवर मनसेचा झेंडा आणि मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आव्हान करणारे स्टिकर्स लावण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता पुणे येथे होणाऱ्या या सभेसाठी सकाळी १० वाजता नाशिकहून सर्व गाड्या सुटणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.