मुंबईत पावसाळ्या तुंबणाऱ्या पाण्यावर मात करण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्प आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार बनवण्यात येणाऱ्या पंपिंग स्टेशनपैंकी रखडलेल्या माहुल पंपिंग स्टेशनच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला. सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यामुळे १५ वर्षांपासून रखडलेल्या या पंपिंग स्टेशनचे काम आता लवकरच सुरू केले जाणार आहे.
मुंबईमध्ये यापूर्वी हाजी अली, इर्ला, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड बंदर, ब्रिटानिया आणि खारमधील गझधरबंध या सहा पंपिंग स्टेशनची कामे पूर्ण झाली आहे. परंतु माहुल आणि मोगरा पंपिंग स्टेशनची कामे मागील १५ वर्षांपासून रखडलेली आहेत. माहुल पंपिंग स्टेशनच्या जागेचा तिढा कायम होता. मिठागराची जागा ताब्यात न आल्याने महापालिकेने खासगी विकासकाच्या ताब्यातील जमिनीची अदलाबदल करण्यात आली. याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या जमिनीची अदलाबदल करत खासगी विकासकाला लाभ दिल्यामुळे भाजपने सत्ताधारी शिवसेनेवर तसेच प्रशासनावर आरोप केले होते. परंतु ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असतानाच याबाबतची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात मागवलेल्या निविदेमध्ये संयुक्त भागीदारीतील तीन कंपन्यांनी भाग घेतला. यामध्ये मेसर्स लक्ष्मी-अविघ्न-विलो ही कंपनी पात्र ठरली आहे. हे काम पावसाळा वगळून ३० महिन्यांमध्ये केले जाणार आहे. यासाठी ४६० कोटी रुपये आणि विविध करांसह ५४६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव सोमवारी झालेल्या बैठकीत भाजपने घातलेल्या गोंधळात मंजूर करण्यात आला आहे.
या भागात पाणी तुंबण्याची संपणार समस्या
कुर्ला नेहरु नगर, टिळक नगर, किंग सर्कल, कलेक्टर कॉलनी, सिंधी कॉलनी, शीव आदी भागांमध्ये निर्माण होणाऱ्या पूरसदृश्यस्थितीवर मात करता येणार आहे.