विविध सेवा देणाऱ्या संस्थांद्वारे उपयोगितांसाठी रस्ते-पदपथ खोदले जातात. या ठिकाणचा राडारोडा (डेब्रिज) वेळच्या वेळी न हटविल्यास हा राडारोडा पावसामुळे वाहून जाऊन विविध ठिकाणी पाणी तुंबू शकते. ही शक्यता लक्षात घेऊन वेळच्या वेळी असा राडारोडा न हटविणा-या संस्थांविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याचे निर्देश महानगरपालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधित सह आयुक्त व उपायुक्तांना मंगळवारी दिले आहेत.
( हेही वाचा : माहुल पंपिग स्टेशनच्या कामाला लवकरच होणार सुरुवात: प्रस्ताव मंजूर )
मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात पावसाळा पूर्व तयारीच्या अनुषंगाने एका विशेष बैठकीचे आयोजन आज महापालिका मुख्यालयातील समिती सभागृह क्रमांक २ येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. या बैठकीला ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेशचंद्र, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी, संबंधित सह आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विविध खात्यांचे प्रमुख यांच्यासह आपत्कालीन व्यवस्थापन खात्याचे संचालक महेश नार्वेकर आणि विविध यंत्रणांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी जबाबदारी ओळखून काम करावे
जनता आणि प्रशासन यांच्यातील दुवा असलेला नगरसेवक आता राहीलेला नसून त्यामुळे जनतेच्या प्रश्न आता प्रशासनाचे अधिकारी म्हणून सर्व अधिकाऱ्यांना सोडवायचे आहे. त्यामुळे नगरसेवक नसल्याने अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करावे अशी सूचना नवनियुक्त प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी केली. या बैठकीच्या सुरुवातीला प्रशासकांनी विविध खात्यांनी व यंत्रणांनी केलेल्या पावसाळा पूर्व कामांचा संक्षिप्त आढावा घेतला. तसेच विविध पावसाळापूर्व विविध कामे ही निर्धारित वेळापत्रकानुसारच वेळच्यावेळी करण्याचे निर्देश देण्यात आले. पावसाच्या पाण्याचा निचरा संथ गतीने होणाऱ्या ठिकाणी यापूर्वी आदेशित करण्यात आल्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
द्रुतगती महामार्गाची काळजी घ्या
पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गांवर पाणी साचू नये किंवा खड्डे पडू नयेत, यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे संबंधित यंत्रणेला निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या दोन्ही महामार्गांलगत असणाऱ्या ‘कल्व्हर्ट’ची सुयोग्यप्रकारे साफसफाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसाळ्यातील संभाव्य आपत्तींच्या अनुषंगाने भारतीय नौदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दल यांना आवश्यक त्या सर्व तयारीसह मदतीसाठी तैनात राहण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्याने पावसाळा पूर्वतयारीचा भाग म्हणून त्यांच्या अखत्यारीतील झाडांची छाटणी वेळच्या वेळी व शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचे उद्याने खात्याला निर्देश दिले आहेत. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे, अशा ठिकाणाबाबत निर्धारित करण्यात आलेल्या बाबींची तातडीने कार्यवाही करण्याचे संबंधित यंत्रणाना निर्देश दिले आहेत. तर साथ रोगांच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने आवश्यक त्या सर्व साधनसामुग्रीसह सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
Join Our WhatsApp Community