महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी महाराष्ट्रालाचं!

115

पार – तापी नर्मदा योजनेंतर्गत महाराष्ट्राच्या हद्दीतून दिले जाणारे १५ टीएमसी पाणी गुजरातच्या उकाई धरणाच्या बॅक वॉटरमधून महाराष्ट्राच्या तापी खोऱ्यात परत मिळणे प्रस्तावित आहे. मात्र त्यास गुजरात राज्याची संमती अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे त्याबाबत पुढे कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणी गुजरातला देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असा खुलासा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना केला.

( हेही वाचा : फडणवीसांच्या पेनड्राइव्ह बॉम्बमध्ये काय आहे दारूगोळा? भाजप नेत्यांविरोधात कसे रचलेले कारस्थान? )

योजनांना गती

गोदावरी खोऱ्यात पश्चिम वाहिनी खोऱ्यातून पाणी वळवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या योजनांपैकी पार-गोदावरी नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य तांत्रिक सल्लागार समिती यांच्याकडे तांत्रिक छाननीच्या अंतिम टप्प्यात आहे. पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी नदीजोड/वळण योजनांद्वारे तापी व गोदावरी खोऱ्यात वळवण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच उपसा वळण योजना खर्चिक असल्याने प्रवाही वळण योजनांना प्राधान्य देण्यात येत आहे. राज्य शासनाने गोदावरी खोऱ्यात पाणी आणण्याच्या सर्व योजनांना गती दिली आहे. गोदावरी खोऱ्यात वैतरणा-मुकणे वळण योजनेद्वारे ११ टीएमसी पाणी वळवण्याच्या क्षमतेची सॅडल भिंत बांधणे योजिले आहे. ही महाविकास आघाडी सरकारची मोठी कामगिरी आहे, असेही पाटील म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील

पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असल्याने मराठवाड्यासाठी पाण्याची किंमत किती आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हे चित्र पुसून काढण्यासाठी राज्य सरकार सर्व शक्य प्रयत्न करत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने वळण बंधाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. बरेच बंधारे पूर्णत्वास आले आहेत. येत्या काळात या भागाला जास्तीत जास्त पाणी कसं देता येईल यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.