बेस्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात?

139

बेस्ट उपक्रमाने घेतलेल्या खासगीकरणाच्या भूमिकेवर कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कंत्राटी बसगाड्यांच्या देखभालीकरिता बेस्ट प्रशासनाने वर्षभर प्रती बस फक्त १ रुपया याप्रमाणे संपूर्ण प्रतीक्षानगर आगार ‘मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंत्राटदाराला आंदण म्हणून बहाल केला आणि आता बेस्ट उपक्रमाच्या सांताक्रूझ आगारात सुद्धा २२ फेब्रुवारीला खासगी कंत्राटदाराच्या बसगाड्यांचा ताफा दाखल झालेला आहे. प्रतीक्षानगर आगारापाठोपाठ ओशिवरा, मालवणी, सांताक्रूझ हे बेस्टचे महत्वाचे तीन आगार सुद्धा उपक्रमाने कंत्राटदाराला बहाल केल्यामुळे कर्मचारी युनियनने सुद्धा आंदोलन पुकारले आहे.

( हेही वाचा : महापालिका निवडणूक भाजप मिशन: महापालिका १३४, भाजप १३४ प्लस )

नोकऱ्यांवर परिणाम

या खासगीकरणामुळे २४ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती भाजपचे पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान २०१७ पासून ४ हजार ५०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून नवीन कामगार भरती केलेली नाही. यामुळे बेस्ट फक्त कागदावरच राहिल, अशी टिकाही शिंदे यांनी केली आहे. येत्या काळात बेस्ट ३ हजार बसेस भाडेतत्वावर घेणार आहे यात चालक वाहकांची नियुक्ती सुद्धा कंत्राटदारामार्फत केली जाणार आहे. या निर्णयाला भाजपने विरोध केला आहे. शिवसेनेने कॉंग्रेसच्या मदतीने हा प्रस्ताव मंजूर केला असून यामुळे बेस्ट उपक्रमातील नोकऱ्यांवर परिणाम होणार आहे, अशी भीती प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली आहे. तर वाहक कंत्राटदाराचे नियुक्त करण्यास भाजपने विरोध करूनही शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला, असा आरोप सुनील गणाचार्य यांनी केला आहे.

खासगीकरणाकडे वाटचाल

मुळातच बेस्टबाबत कोणताही अनुभव नसलेल्या ‘मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंत्राटदाराच्या आस्थापनेची कायदेशीर नोंदणी ही १३ जुलै २०२० रोजी फक्त रुपये १० लाख इतक्या भाग भांडवलावर झालेली असून ह्या कंत्राटदाराला बेस्टने इतक्या मोठ्या प्रमाणात बसगाड्या चालवण्याचे कंत्राट कसे काय दिले? अशा नवख्या कंत्राटदारांवर बेस्ट उपक्रमाने कसा विश्वास ठेवला असा प्रश्न ‘आपली बेस्ट आपल्यासाठी’ या समितीने उपस्थित केला आहे. तर मुंबईत बेस्ट उपक्रमाचे ५२० मार्ग सुरू होते. परंतु आता ५२० पैकी १५० बसमार्ग बंद करण्यात आल्याचा आरोप भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.