युक्रेनमधून मायदेशी आलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार का?

132

रशिया-युक्रेनमध्ये युद्धाला सुरूवात झाल्यावर युक्रेनमध्ये शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी मायदेशी परतले. या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचे काय असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या २५० विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसेच त्यांना भारतीय विद्यापीठांत सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येणार आहे. कुलगुरुच्या अभ्यासगटांची व्याप्ती वाढवून सकारात्मक दृष्टीने सर्व बाबींची तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे दोन हजार विद्यार्थी

विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती पाहता त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. युक्रेनमध्ये ३३ विद्यापीठे वैद्यकीय शिक्षण देत असून, याठिकाणी १८ हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते. यातील दोन हजार विद्यार्थी हे महाराष्ट्राचे आहेत. आपल्या देशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा घेण्यात येते. मात्र, रशिया आणि युक्रेनमध्ये ही परिक्षा न देता प्रवेश मिळतो. तसेच, शैक्षणिक शुल्कही भारतातील शुल्कापेक्षा कमी आकारले जाते. या विद्यार्थ्यांना भारतातील विद्यापीठात सामावून घेण्यासाठी पुन्हा परीक्षा देणे गरजेचे आहे. अथवा अन्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत कुलगुरू डॉ माधुरी कानिटकर यांनी सांगितले.

( हेही वाचा : शिवजयंती सण आहे, तिथीनुसारच साजरा करा! राज ठाकरेंकडून शिवसेनेची गोची )

अहवाल महिनाभरात सादर करणार

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले, रशिया आणि युक्रेन देशा शेजारील ७ ते ८ देशांतही अभ्यासक्रम सारखाच असल्याने इतर देशांसोबत सामंजस्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल का याबाबत चर्चा करण्याचा प्रस्ताव केंद्राला सादर करण्यात येईल. भारतात पुन्हा येणा-या विद्यार्थ्यांना (नीट) सामायिक प्रवेश परीक्षा देण्यासही मानसिकरित्या तयार करावे लागेल. याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने युक्रेन सरकार शिक्षण देईल का यासंदर्भातही विचार करावा लागेल. कुलगुरूंचा जो अभ्यासगट नेमला आहे. त्यांनी या सूचनांचा अभ्यासासाठी अंतर्भाव करावा व अहवाल महिनाभरात सादर करावा. जेणेकरून शासनास धोरणनिश्चितीसाठी त्याचा उपयोग होईल. असेही मंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.