मनसेच्या 16व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत आपल्या नेहमीच्या शैलीत भाषण केले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राज ठाकरे यांनी त्यांचा समाचार घेतला. राज्यपालांना शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्याबाबत काही माहिती आहे का, असे म्हणत त्यांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली.
राज्यपालांना पहिल्यांदा भेट झाली, त्याची आठवण काढत राज ठाकरे म्हणाले, तेव्हा मला वाटले शेकहँड केल्यावर माझा हात बघायला लागतील, आप का मंगल इथर है, बुध उधर है…कुडबुड्या ज्योतिषासारखे. बघितले ना कसे आहेत ते?, असे सांगत राज ठाकरे यांनी राज्यपालांची नक्कल केली.
(हेही वाचा शिवजयंती सण आहे, तिथीनुसारच साजरा करा! राज ठाकरेंकडून शिवसेनेची गोची)
नुसती भांडणे लावायची
राज्यपालांना काही समज वगैरे काही आहे का? छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी तुम्हाला काही माहिती आहेत का? आपला काही संबंध नसताना नुसतं बोलून जायचं? ना छत्रपतींनी कधी सांगितलं रामदास स्वामी माझे गुरू होते, ना रामदास स्वामींनी कधी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज माझे शिष्य होते. नुसती भांडणं लावायची ज्यातून एकाचं शौर्य कमी करायचं आणि एकाची विद्वत्ता कमी करायची, असेही राज ठाकरे म्हणाले.
महापुरुषांना फक्त बदनाम करायचं
आम्ही काही बोध घेणार की नाही? रामदास स्वामींनी काय लिहिलंय? रामदास स्वामींनी शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय ते माझ्या घरात लावलंय मी. त्यांनी शिवछत्रपतींबद्दल जे लिहिलंय त्याहून चांगलं आजपर्यंत मी दुसरीकडे कुठे वाचलेलं नाही. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आमच्याकडे योगी सापडतच नाही. धाड पडली की कळतं ते फक्त श्रीमंत आहे. आमच्याच महापुरुषांना फक्त बदनाम करायचं, तुमती माथी भडकवून मतं मिळवायची एवढाच उद्योग सुरू आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
(हेही वाचा संजय राऊत किती बोलतात…चॅनेल लागले की सुरू होतात! राज ठाकरेंनी नक्कल करत केली टीका)
Join Our WhatsApp Community