Punjab Election Result 2022: मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू

142

पंजाबसह देशातील पाच राज्यांमध्ये गुरुवारी 10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीची मतगणना होणार आहे. यापार्श्वभूमीवर पंजाबमध्ये कमल 144 (प्रतिबंधात्मक आदेश) लागू करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक केंद्राच्या बाहेर नागरिकांना गर्दी करता येणार नसल्याचे पंजाबचे मुख्य निवडणूक अधिकारी ए करुणा राजू यांनी सांगितले.

विजय मिरवणुकीवर बंदी

यासंदर्भात ए. करुणा राजू म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतमोजणीसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली असून, विजयी उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दोन व्यक्तींसह दाखले घेण्यासाठी जाऊ शकतात. विजय मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मतमोजणी लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी आणि उपायुक्तांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यासोबतच मतमोजणी केंद्राबाहेर लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. राजू म्हणाले की, राज्यातील 66 ठिकाणी उभारण्यात आलेल्या 117 मतमोजणी केंद्रांवर सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांवर केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या 45 कंपन्या तैनात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासह सुमारे 7500 अधिकारी मतमोजणी प्रक्रियेत गुंतले आहेत.

(हेही वाचा -Election Result 2022: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा फैसला, मतमोजणीला सुरुवात)

मतमोजणी केंद्राचा 100 मीटर परिसर पादचारी क्षेत्र घोषित

मतमोजणी केंद्राचा 100 मीटर परिसर पादचारी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. या परिसरात कोणालाही वाहने नेण्यास परवानगी दिली जाणार नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनधिकृत लोकांचा प्रवेश रोखण्यासाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. राजू म्हणाले की, मतमोजणी पूर्ण होईपर्यंत सरकारने 10 मार्च हा दिवस कोरडा दिवस म्हणून घोषित केला आहे. मोबाईल फोन, टॅब्लेट आणि कॅमेरे असलेले लॅपटॉप यांसारखी उपकरणे मतमोजणी केंद्रात आणण्यास मनाई असेल असेही त्यांनी स्पष्ट केलेय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.