आजी-माजी मुख्यमंत्र्यांना बसला झटका! ‘या’ उमेदवारांनी केला पराभव

131

देशात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत असून, हळूहळू सत्तेचे चित्र स्पष्ट होत आहे. 4 राज्यांत आपली सत्ता कायम ठेवण्यात भाजपला यश मिळत असल्याचे दिसत आहे. पण या सर्व निवडणुकांमध्ये काही अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल सुद्धा पहायला मिळत आहेत. पंजाब आणि उत्तराखंड येथे अनेक दिग्गजांसोबतच खुद्द मुख्यमंत्र्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पंजाबमध्ये आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव

पंजाबमध्ये आजी-माजी दोन्ही मुख्यमंत्र्यांचा दारुण पराभव झाल्याचे पहायला मिळत आहे. सध्याचे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी या निवडणुकीत दोन जागांवरुन निवडणूक लढवली. या दोन्ही जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. चमकौर साहिब मतदारसंघातून आपचे उमेदवार चरणजीत सिंह यांनी चन्नी यांचा पराभव केला आहे. तर भदौर मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या लाभ सिंग अगोक यांनी त्यांचा पराभव केला आहे.

(हेही वाचाः शिवसेना-राष्ट्रवादीने गोव्यात किती मते मिळवली?)

त्याचबरोबर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह यांना देखील मोठा धक्का बसला आहे. पटियाला शहरी विधानसभा मतदारसंघात आम आदमी पार्टीचे उमेदवार अजित पाल सिंह कोहली यांनी त्यांना धोबीपछाड करत पराभूत केले आहे.

उत्तराखंडमध्ये कमळ खुललं, पण…

उत्तराखंडमध्ये भाजपला सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे. मात्र असे असताना उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजप उमेदवार मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना खटिमा मतदार संघातून पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसच्या भुवन कापरी यांनी त्यांना धूळ चारली आहे. तसेच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांना या निवडणुकीतही मोठा झटका बसला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

(हेही वाचाः Election Result 2022: पंजाबमध्ये ‘आप’च बाप! काँग्रेसला ‘झाडू’न काढले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.