संगमनेर (जिल्हा नगर) तालुक्यातील आंबी-दुमाला येथील तलाठी कार्यालय बंद असून या गावातील ग्रामस्थांना ७/१२ उतारा, तसेच अन्य कागदपत्रांसाठी अन्य गावात जावे लागते, त्याचप्रकारे या परिसरात अवैध पद्धतीने गौण उत्खनन चालू आहे, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना १० मार्च या दिवशी प्रश्नोत्तरात केला. या संदर्भात उत्तर देतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘यापूर्वी तेथे पूर्णवेळ तलाठी नव्हता; मात्र सध्या तेथे पूर्णवेळ तलाठी आहे. अवैध पद्धतीने होणार्या गौण उत्खननाचे अन्वेषण करू’, असे उत्तर दिले.
घरभत्ता बंद करावा
या संदर्भात शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, अनेक ठिकाणी असे दिसून येते की, तलाठी कार्यालय असूनही तेथे उपस्थित असलेला तलाठी प्रत्यक्षात किती काम करतो? ७/१२ उतार्यांसह अन्य कागदपत्रांसाठी तलाठी कार्यालय आणि अन्य कार्यालयात सामान्य माणसांना आर्थिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अशा प्रकारे सामान्य माणासांना जे तलाठी त्रास देतात त्याविषयी शासनाने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. या संदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, गावातील ग्रामस्थ ७/१२ उतार्यांच्या मागण्यासाठी सकाळी ७.३० वाजता येतात. चहा-पोहे खाण्याच्या वेळेत येत असल्याने कदाचित त्रास टाळण्यासाठी तलाठी थोडे लांब रहात असतील. सध्या कोणताही ७/१२ ‘ऑनलाईन’ मिळतो. त्यामुळे काही अडचण येण्याचे कारण नाही. या वेळी काही सदस्यांनी ‘जर तलाठी गावातच रहात नाही, असे लक्षात आले तर शासनाने त्यांचा घरभत्ता बंद करावा’ अशी सूचना केली. त्या वेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ही सूचना मान्य केली.
(हेही वाचा पंजाबमधील बदल कॉंग्रेसला धक्का देणारा! काय म्हणाले शरद पवार?)
Join Our WhatsApp Community