पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला असताना, तरुण उमेदवारांनी मात्र चांगलीच बाजी मारल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे पुत्र पंकज सिंह यांनी मोठा विजय मिळवला आहे.
पंकज सिंह यांनी उत्तर प्रदेशातील नोएडा मतदार संघातून तब्बल 1 लाख 81 हजार 369 मतांनी विजय मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. विधानसभा निवडणुकीत हा आजवरचा सर्वात मोठा विजय असल्याचे म्हटले जात आहे. या विजयासोबतच सिंह यांनी अजित पवार यांचा विक्रम मोडला आहे.
(हेही वाचाः आजी-माजी मुख्यमंत्र्यांना बसला झटका! ‘या’ उमेदवारांनी केला पराभव)
अशी आहे मतांची आकडेवारी
उत्तर प्रदेशातील नोएडा मतदार संघातून आपल्याला पंकज सिंह यांना एकूण 2 लाख 44 हजार 91 मते मिळाली आहेत. त्यांच्याविरोधात समाजवादी पार्टीचे उमेदवार सुनिल चौधरी यांना केवळ 62 हजार 722 मतांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे पंकज सिंह यांचा हा मोठा विजय आहे. पंकज सिंह यांना 70.16 टक्के तर सुनिल चौधरी यांना 18.4 टक्के मते मिळाली आहेत.
अजित पवारांचा विक्रम मोडला
याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1 लाख 65 हजार मतांनी विजय मिळवण्याचा विक्रम केला होता. बारामती मतदारसंघातून त्यांनी इतक्या मोठ्या मतांनी विजय मिळवला होता. त्यांचा हा विक्रम आता पंकज सिंह यांनी मोडीत काढला आहे.
(हेही वाचाः Uttar Pradesh Election Result 2022: एकाही मुसलमानाला उमेदवारी न देता भाजपाने फडकावला भगवा)
उत्तर प्रदेशात फिर एक बार…
देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेश राज्याला विशेष महत्व आहे. भाजपला गेल्या विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात सत्ता स्थापनेची संधी मिळाली होती. भाजपने आपला हा विजयी रथ कायम ठेवला आहे. 2022च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवण्यात यश आले आहे.
Join Our WhatsApp Community