घोटाळ्यात बुडालेले लोक एकत्र येऊन केंद्रीय तपास यंत्रणांवर दबाव आणत आहेत. या लोकांचा देशाच्या न्यायपालिकेवरही विश्वास नाही. एक बाजूला हजारो, करोडोंचा भ्रष्टाचार करायचा, त्याची चौकशी सुरु झाली की तपास यंत्रणांवर दबाव आणायचा, त्या कारवाईला प्रांतवाद, धर्म, जातीशी जोडायचा, असा प्रकार सुरु झाला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांवर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला.
देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यावर त्यातील उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांत भाजपाचा विजय झाला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
(हेही वाचा Uttar Pradesh Election Result 2022: एकाही मुसलमानाला उमेदवारी न देता भाजपाने फडकावला भगवा)
केंद्रीय तपास यंत्रणांना बदनाम केले जातेय
भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, देशात भ्रष्टाचार करणाऱ्यांचा तिरस्कार निर्माण झाला पाहिजे, भ्रष्टाचार काही लोकांची ओळख झाली आहे. भाजप प्रामाणिक राजकरण करण्याचे आश्वासन देत २०१४ मध्ये निवडून आले. आमच्या सरकारने भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे, ती अपेक्षा आम्ही पूर्ण केली पाहिजे, म्हणून आमच्या सरकारने भ्रष्टाचारींवर कारवाई सुरु केली. त्यानंतर मात्र ही कारवाई करणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांना बदनाम करण्यासाठी हे भ्रष्टाचारी लोक पुढे येऊ लागले आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईला जाती-धर्माशी जोडले जातेय
कोणत्याही माफियावर कारवाई होते, तेव्हा त्यालाही धर्माशी जोडले जात आहे. देशातील नागरिकांनी याचा विचार करावा की, माफियांना तुमचा संप्रदाय, जातीपासून दूर ठेवा. उत्तर प्रदेशातील विजयामागील कारणही हेच आहे, कारण तेथील जनतेने अशा राजकारणाचा अनुभव घेतला आहे. जाती, संप्रदाय याना बदनाम करणाऱ्यांपासून दूर राहून राज्याच्या विकासाला प्राध्यान्य दिले पाहिजे, हे जनतेने ओळखले आहे. हे निवडणुकीचे निकाल देशाच्या पुढील २५ वर्षांतील विकास निश्चित करत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
Join Our WhatsApp Community