राज्यसभेत भाजप होणार आत्मनिर्भर! चार राज्यांतील विजयाचा ‘असा’ होणार फायदा

भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या पहिल्यांदाच शंभरी पार होणार आहे.

115

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. पाचपैकी ४ राज्यांत भाजपला आपली सत्ता कायमं ठेवण्यात यश आल्यामुळे आता संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेतही भाजपचे वर्चस्व वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. राज्यसभेतील भाजप सदस्यांची संख्या ही शंभरी पार होण्याची शक्यता असून, राज्यसभेतही भाजप सगळ्यात मोठा पक्ष होणार आहे.

तर पंजाबमध्ये सत्ता स्थापन करणा-या आम आदमी पार्टीला सुद्धा अच्छे दिन येणार असून, राज्यसभेत ‘आप’ पाचवा सर्वात मोठा पक्ष होणार आहे.

(हेही वाचाः अभी तो असली लढाई मुंबई में होगी! फडणवीसांचा नारा)

भाजप होणार सर्वशक्तीशाली

सध्या राज्यसभेत भाजपकडे एकूण 97 जागा आहेत. भाजपची राज्यसभेतील ही सदस्य संख्या पहिल्यांदाच शंभरी पार होणार आहे. भाजपला 104 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला राज्यसभेत 243 जागांपैकी 122 पर्यंत संख्याबळ मिळून बहुमत मिळवता येणार आहे. यामुळेच भाजपवर सातत्याने टीका करणा-या बिजू जनता दल सारख्या पक्षांवरील भाजपचे अवलंबित्व कमी होणार असून, त्यांच्या बाहेरील पाठिंब्याची मोदी सरकारला आवश्यकता कमी भासणार आहे.

भाजपची ताकद वाढणार

उत्तर प्रदेशातून 31, उत्तराखंडमधून 3, पंजाबमधून 7, तर गोवा आणि मणिपूरमधून प्रत्येकी 1 उमेदवार राज्यसभेवर निवडले जातात. या पाचपैकी 4 राज्यांत भाजपने आपली सत्ता कायम ठेवली आहे. आता राज्यसभेतील 1/3 सदस्यांसाठी नव्याने निवडणुका घेण्यात येणार आहेत. या निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशातून 3, तर आसाम, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधून काँग्रेसच्या चार जागांवर विजय मिळवण्यात, भाजपला यश मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या वर्षअखेरीस काँग्रेसच्या राज्यसभेतील 34 जागा कमी होऊन त्यांची संख्या 27 होणार आहे.

(हेही वाचाः राजनाथ सिंह यांच्या सुपुत्राने मोडला पवारांचा विक्रम! मिळवला सर्वात मोठा विजय)

राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका

यावर्षी राज्यसभेच्या एकूण 75 जागांसाठी मतदान होणार आहे. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभेचे खासदार हे राज्य विधानसभांतील आमदारांद्वारे निवडून दिले जातात व ते केंद्रात राज्याचं प्रतिनिधीत्व करत असतात. राज्यसभेत एनडीए सरकार सुरुवातीला अल्पमतात होते. त्यामुळे पहिल्या पाच वर्षांत दोन्ही सभागृहांत कायदे मंजूर होण्यासाठी विलंब होत होता. परंतु गेल्या दोन वर्षांपासून मोदी सरकारने राज्यसभेत आपले वर्चस्व निर्माण केले आहे.

‘आप’चा होणार फायदा

आपला पंजाबमधील विजयाचा मोठा फायदा होणार आहे. पंजाबमधून एकूण सात उमेदवार हे राज्यसभेवर निवडून जातात. त्यामुळे यावर्षी होणा-या निवडणुकांमध्ये या सात जागांपैकी किमान सहा जागांवर आपला यश मिळवता येईल. सध्या आपचे राज्यसभेवर दिल्लीतून तीन खासदार आहेत. पंजाबमधील विजयानंतर भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम नंतर आप हा राज्यसभेतील पाचवा मोठा पक्ष ठरणार आहे.

(हेही वाचाः आजी-माजी मुख्यमंत्र्यांना बसला झटका! ‘या’ उमेदवारांनी केला पराभव)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.