राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सरकारमधील मंत्री आणि आमदार यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत. आता राज्य मंत्री नवाब मलिक यांच्यावरील आरोपांवरुन पुन्हा एकदा विरोधी पक्ष भाजप आक्रमक झाला असून, मलिकांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. एकीकडे राज्यात ठाकरे सरकारचे मंत्री घोटाळेबाज असल्याचे चित्र असताना, दुसरीकडे याच सरकारमधील तिन्ही प्रमुख घटक पक्षांचे खासदार देखील डागाळलेले आणि घोटाळेबाज असल्याची माहिती समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरावर ईडीच्या पथकाने धाड टाकली, यानंतर त्यांची रवानगी कोठडीत करण्यात आली. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध आणि मनी लॉंड्रिंगप्रकरणी त्यांना अटक करण्यात आल्याने त्यांची चौकशी व्हावी आणि त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. मलिकांच्या आधीही नेते मंडळी आणि आमदारांवरही कारवाई करण्यात आली आहे. मात्र आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे खासदार पण डागाळलेले असल्याची माहिती समोर येत आहे.
(हेही वाचा –महाविकास आघाडीतील ‘हे’ आहेत डागाळलेले नेते!)
खासदारांवरही अनेक गुन्हे दाखल
महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण ४८ खासदार निवडून जातात. यामध्ये भाजपचे २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३, काँग्रेस, महायुती आणि एमआयएमचा प्रत्येकी १ खासदार आहे. राज्य स्तरावर असे संख्याबळ असले तरी काँग्रेसचे देशभरातून एकूण ५२, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ खासदार लोकसभेवर आहेत. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. या सरकारमधील नेत्यांवर सातत्याने विरोधी पक्ष भाजपकडून गंभीर आरोप करण्यात येत आहेत. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. एकीकडे राज्यात ही स्थिती असताना, या तिन्ही पक्षांच्या देशभरातील खासदारांवरही अनेक गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरुन मिळत आहे.
अशी आहे डागाळलेल्या खासदारांची संख्या
- शिवसेनेच्या एकूण १८ खासदारांपैकी ११ खासदारांवर फौजदारी खटले दाखल
- काँग्रेसच्या एकूण ५२ खासदारांपैकी २९ खासदारांवर फौजदारी खटले दाखल
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ५ खासदारांपैकी दोन खासदारांवर फौजदारी खटले दाखल
- भारतीय जनता पक्षाच्या एकूण ३०३ खासदारांपैकी ११६ खासदारांवर फौजदारी खटले दाखल
संसदेच्या किती टक्के सदस्यांवर गुन्हेगारी खटला?
सिंगापूरच्या पंतप्रधानांनी भारतातील खासदारांवर फौजदारी खटले असल्याचा आरोप केला होता, त्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीवरून भारतात ४३ टक्के खासदारांवर खटले दाखल असल्याची माहिती India in Pixels ने दिली आहे. यानुसार, भारतातील एकूण ४३ टक्के खासदारांवर फौजदारी खटले दाखल असून महाराष्ट्रात ५८.३ टक्के खासदारांवर गुन्हे दाखल आहे. तर देशात या प्रकरणी खटले दाखल झालेल्या राज्यांपैकी सर्वाधिक ९० टक्के खासदार केरळ राज्यात आहेत. त्या खालोखाल बिहार ८० टक्के, तेलंगणा ५८.८ टक्के, महाराष्ट्र ५८.३ टक्के, बंगाल ५४.८ टक्के, उत्तर प्रदेशात ५५ टक्के, हिमाचल प्रदेश ५० टक्के, दिल्ली ४२.९ टक्के, आंध्र ४४ टक्के, तामिळनाडू ४३.६ टक्के त्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख ३३.३ टक्के आणि मध्यप्रदेश ३१ टक्के अशी आकडेवारी आहे. यासह प्रत्येक राज्यातून प्रति खासदार सरासरी ( दरडोई ) प्रकरणांची संख्या ही १.९ इतकी आहे.
(टीप- वरील उमेदवाराशी संबंधित माहिती ही २०१९ रोजी झालेल्या निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या स्वयंघोषित प्रतिज्ञापत्रावर आधारलेली आहे. मात्र आता यात बदल असू शकतात.)
Join Our WhatsApp Community