राज्यातील किनारपट्टी भागांत अंडी घालण्यासाठी येणा-या ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादी कासवांवर सॅटलाईट टॅगिंगच्या माध्यमातून भ्रमणमार्ग शोधण्याच्या प्रयोगात एका मादी कासवाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात पाच मादी ऑलिव्ह रिडले कासवांना सॅटलाईट टॅगिंग केले गेले होते. त्यापैकी १६ फेब्रुवारीला टॅग केलेल्या लक्ष्मी या कासवाची गेले १२ दिवस कोणतीच माहिती मिळालेली नाही, अशी माहिती वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडून दिली गेली.
टॅग केलेल्या लक्ष्मी कासवाबद्दल…
लक्ष्मीला गुहागर किनारपट्टीवर १६ फेब्रुवारी रोजी सॅटलाईट टॅगिंग केले गेले होते. सुरुवातीला लक्ष्मी गुहागर ते गणपतीपुळे येथील समुद्रात फिरत असल्याची माहिती सॅटलाईट टॅगिंगने दिली जात होती. पहिल्या दहा दिवसांत लक्ष्मीच्या भ्रमणमार्गाचा हा पत्ता खुद्द कांदळवन कक्षातील अधिका-यांनी सांगितला होता. लक्ष्मीसह उर्वरित चार मादी ऑलिव्ह रिडलेही स्वैर संचार करत असल्याची माहितीही दिली गेली. यापैकी दुस-यांदा सॅटलाईट टॅगिंग केलेल्या सावनी या मादी ऑलिव्ह रिडले कासवाने महिन्याभरानंतर २५ फेब्रुवारी रोजी पुन्हा अंडी घालण्यासाठी किनारपट्टी गाठली.
(हेही वाचा – संपकरी एसटी कर्मचा-यांना २२ मार्चपर्यंत मिळाले संरक्षण)
अधिकाऱ्यांकडून ही भिती व्यक्त
सॅटलाईट टॅगिंगमधील हा पहिला मोठा उलगडा होता. त्यानंतर इतर कासवांच्या भ्रमणमार्गाबाबतही वन्यजीवप्रेमींची उत्सुकता वाढली होती. मात्र अचानक लक्ष्मीबाबत १ मार्चपासून काहीच सॅटलाईट टॅगिंगमधून संकेत मिळत नसल्याची कबुली वनविभागाच्या कांदळवन कक्षाने दिली. सॅटलाईट टॅगिंगसाठी वापरल्या जाणा-या बॅटरीची क्षमता वर्षभर पुरणारी असताना बॅटरी कशी खराब झाली, हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून अधिका-यांच्या वर्तुळात फिरत होता. अखेर अकरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर एकतर सॅटलाईट टॅगिंगसाठी वापरलेली बॅटरी खराब झाली असावी किंवा लक्ष्मी या मादी ऑलिव्ह रिडले कासवाचा मृत्यू झाला असावा, अशी भीती अधिका-यांनी व्यक्त केली.
Join Our WhatsApp Community