मावा फेस्टिव्हलमधून पुरुषसत्तेला सणसणीत चपराक!

144

पवई येथील एस. एम. शेट्टी महाविद्यालयाच्या सभागृहात ११ मार्चला स्त्री-पुरुष समानता, लिंगभेद, मर्दांगी व लैंगिक विविधता समभाव या विषयावर सिने-महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘मर्द को दर्द होता है’ या नाटकाचे सादरीकरण झाले आणि या नाटकाचा प्रयोग पाहून सगळेच हादरुन गेले.

मर्द को दर्द नही होता हा अमिताभ बच्चन यांचा डायलॉग आपल्या सर्वांनाच माहिती आहे. २०११ साली मर्द को दर्द नही होता नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. पुरुष म्हटल्यावर तो कणखर असला पाहिजे, स्त्रीला वरचढ झाला पाहिजे, असा एक निमय ह्या पुरुषसत्ताक संस्कृतीने निर्माण केलेला आहे.

माणूस घडवण्याची कार्यशाळा सुरु करायला हवी

आपली संस्कृती मुळातच पुरुष घडवण्याची कार्यशाळाच आहे. आपल्याकडे पुरुष घडवले जातात. म्हणजे काय तर, पुरुषाने अमुक पद्धतीने आचरण केलं पाहिजे. पुरुषाने रडू नये, भावनाप्रधान असू नये असे सांगितले जाते. पण पुरूष आणि स्त्री ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. तुमचं जेंडर काय आहे, यावरुन तुम्ही कसं वागावं हे ठरवता येत नाही.

( हेही वाचा : लैंगिक समभाव विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन! )

खरंतर आपण माणूस घडवण्याची कार्यशाळा सुरु करायला हवी. मर्द को दर्द होता है या नाटकातून हाच संदेश द्यायचा आहे की पुरुषाला पुरुष म्हणून घडवू नका. कारण तुमच्या नजरेतला पुरुष हा विरुद्ध लिंगांवर अत्याचार करणारा आहे. तुम्ही ज्या गोष्टीला पौरुषत्व म्हणता, ती गोष्ट मुळात रानटी आहे. म्हणूनच हे नाटक पुरुषसत्तेला सणसणीत चपराक लगावतं. असे आयोजकांनी स्पष्ट केले. मेन अगेन्स्ट वॉइलेन्स ऍंड अब्युस (मावा) या संस्थेने हा फिल्म फेस्टिवल आयोजित करुन समाजकारणाचं प्रचंड मोठं काम हाती घेतलेलं आहे आणि तरुणांचा या कार्यास भरभरुन प्रतिसाद लाभत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.