मुंबई पोलीस आयुक्तांची सीबीआय चौकशी! महाविकास आघाडीला धक्का

117
सीबीआयने मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांचीही तब्बल सहा तास चौकशी केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात ही चौकशी करण्यात आली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पांडे यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात माजी आयुक्त परमबीर सिंह यांना फोन करुन देशमुखांविरुद्धची तक्रार मागे घेण्यासाठी प्रभाव टाकण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

परमबीर सिंग यांच्यावर दबाव टाकला होता 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची गृहरक्षक विभागात बदली झाली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये अनिल देशमुख यांच्या विरोधात पत्र लिहिले होते, ज्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून परमबीर सिंह यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे. पुढे परमबीर सिंह यांनी आपल्याविरुद्धचा तपास मागे घेण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याशिवाय त्यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे जे सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत, यांचे संभाषण उघड केले होते. ज्यामध्ये कथितपणे संजय पांडे यांनी परमबीर सिंह यांना फोन करून त्यांचे पत्र मागे घेण्यास सांगितले आणि जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल केले जातील, असे म्हटले होते. या प्रकरणी सीबीआयने अखेर पांडे यांची चौकशी केली.

पांडे आणखी एक प्रकरणात अडकले 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  गौप्यस्फोट केला. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या माध्यमातून सत्ताधारी हे भाजपातील वरिष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्याखाली अडकवण्याचे कारस्थान रचले होते. त्याचे स्टिंग ऑपरेशन करून ते व्हिडीओ विधानसभा अध्यक्षांना दिले. यामध्ये चक्क मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या नावाचा उल्लेख होता. १२३ मिनिटांचे हे व्हिडीओ रेकॉर्डिंग आहे. त्यामध्ये विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून भाजपच्या नेत्यांविरोधात गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अडकवण्यासाठी कसे कारस्थान रचत आहे, याचे पुरावे आहेत. त्यामध्ये मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांचाही उल्लेख आहे. त्यामुळे आयुक्त संजय पांडे हे आणखी एका प्रकरणात अडकले आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.