होळीचा सण येत्या काही दिवसांवर आलेला असून कोळी बांधवांचा हा सर्वांत महत्वाचा सण आहे. त्यामुळे कोळीवाड्यांमध्ये मोठ्याप्रमाणात उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा केला जात असल्याने, कोळीवाड्यांमध्ये हा सण साजरा करण्याबाबत स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून लोकांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली जात आहे. मात्र, वरळी कोळीवाड्यात होळीचा पारंपारिक सण दणक्यात साजरा केला गेला पाहिजे असे मनसेने पोलिसांसोबतच्या बैठकीत ठणकावून सांगितले. जर मध्यरात्रीपर्यंत क्रिकटचे सामने चालतात मग आमचे सण का नको असा सवाल करत मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी हा सण साजरा व्हायलाच हवा आणि तो दणक्यातच व्हायला हवा असे सांगितले.
( हेही वाचा : मुंबई महापालिकेत सत्तापालट…सन १९८४-८५ची पुनरावृत्ती होणार? )
यंदा कोरोना निर्बंध नाहीत
वरळी कोळीवाड्यात मोठ्याप्रमाणात पारंपारिक होळीचा सण साजरा केला जात असल्याने या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्थानिक पोलिसांनी कोळी बांधवांच्या संस्थांचे प्रमुख पदाधिकारी व विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. मागील दोन वर्षे कोविडमुळे होळीचा सण मनसोक्तपणे साजरा करता आलेला नाही. परंतु आता कोविडचा प्रभाव कमी होऊन निर्बंधही कमी झाल्याने आता हा सण यंदा मोठ्याप्रमाणात साजरा केला जाण्याची शक्यता आहे.
सण दणक्यात साजरा व्हायला हवा
यापार्श्वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी मागील वर्षी पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कोळी बांधवांनी होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा केला नाही. त्यावेळी आपल्या भावना ऐकल्या, कोणीही आपल्याला विरोध केला नव्हता. परंतु यंदा तर होळी होणारच असे सांगत धुरी यांनी हा हिंदू सण आहे, त्यामुळे तो साजरा व्हायलाच पाहिजे आणि दणक्यात व्हायला हवा, बाहेर काहीच निर्बंध नाही, कसलीही बंधने नाही, रात्रीचे क्लब चालतात, क्रिकेटच्या स्पर्धा पहाटेपर्यंत चालतात. त्यामुळे या सणावर बंधने घालू नका, असे त्यांनी सांगितले. आता परीक्षा असल्याने डिजेच्या वापराबाबत कोळीबांधवांनी काळजी घ्यावी अशीही विनंती त्यांनी केली.
Join Our WhatsApp Community